रखडलेल्या कामांमुळे वाहतूककोंडीत आणखी भर
By स्नेहा मोरे | Published: December 12, 2022 11:25 AM2022-12-12T11:25:02+5:302022-12-12T11:25:09+5:30
सामान्यांच्या खिशालाही चाट; इंधन खर्च आणि वेळेचा सहापट अपव्यय
- स्नेहा मोरे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : धोकादायक असल्याने बंद असलेला लोअर परळचा पूल, मेट्रोच्या कामामुळे महालक्ष्मी परिसरातील वाहतूककोंडी, श्रीराम मिलजवळ लागणारी वाहनांची रांग अशा एक ना अनेक समस्यांमुळे मुंबईकरांच्या नाकीनऊ आणले आहेत. लोअर परळ पुलापासून अवघ्या दहा मिनिटांच्या प्रवासाला या रखडलेल्या कामामुळे तब्बल तासाभराचा मनस्ताप सहन करावा लागतोय. यामुळे इंधन खर्च आणि अधिकचा वेळ लागल्याने प्रशासनाला जाग कधी येणार, असा सवाल मुंबईकर विचारत आहेत.
लोअर परळ उड्डाणपूल धोकादायक ठरल्याने २४ जुलै २०१८ पासून दुरुस्तीसाठी बंद आहे. या परिसरात सामान्य नागरिकांच्या चाळींपासून, उच्चभ्रू वस्ती आणि मोठी काॅर्पोरेट कार्यालयेही आहेत. त्यामुळे या सर्वच नागरिकांना मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर जोडण्यासाठी करी रोड आणि लोअर परळ ही स्थानके सोयीची ठरतात. मात्र, हा पूल बंद झाल्याने येथील नागरिकांसह नोकरदारांची दररोजच ससेहोलपट होत आहे.
अंधेरी-वांद्रे येथून इथे येणाऱ्यांसाठी वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या माध्यमातून वरळी - महालक्ष्मी पुलाचा आधार घेत लोअर परळमध्ये येणे सोयीचे होते. आता मात्र हे सर्व बंद झाले आहे.
- योगेश गायतोंडे, स्थानिक
वाहतूककोंडीची ठिकाणे
लोअर परळ ते प्रभादेवी परिसरातील माॅल्सपर्यंत पोहोचण्यासाठी वाहनांना साधारण ५० मिनिटे लागतात.
करी रोडवरून महालक्ष्मी आणि वरळी ते लोअर परळला जाणाऱ्या सर्व मार्गांवरही वाहनांच्या रांगा लागतात.
नेहरू विज्ञान केंद्रानजीक मेट्रोचे काम सुरू असल्याने या ठिकाणी दररोज सायंकाळी वाहतूक खोळंबते. बाबाजी जामसंडेकर मार्ग, सेनापती बापट मार्गावर तर दिवसरात्र वाहतूक कोंडी असते.