सीएनजी दरवाढीच्या विरोधात संपाचा इशारा
By admin | Published: November 4, 2014 01:06 AM2014-11-04T01:06:05+5:302014-11-04T01:06:05+5:30
महानगर गॅस लिमिटेडच्यावतीने १ नोव्हेंबरपासून सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली. त्याला टॅक्सी संघटनेकडून विरोध करण्यात आला
मुंबई : महानगर गॅस लिमिटेडच्यावतीने १ नोव्हेंबरपासून सीएनजी गॅसच्या दरात वाढ करण्यात आली. त्याला टॅक्सी संघटनेकडून विरोध करण्यात आला असून, दर कमी करा अन्यथा संपावर जाऊ, असा इशारा मुंबई टॅक्सीमेन्स युनियनकडून देण्यात आला आहे. मंगळवारी बांद्रा येथील महानगर गॅस लिमिटेडच्या कार्यालयासमोर टॅक्सीचालकांकडून निदर्शने करण्यात येणार असून, यासंदर्भात एक निवेदनही देण्यात येणार आहे.
सीएनजी गॅसच्या दरात प्रति किलो ४ रुपये ५० पैशांची, तर घरगुती वापराच्या गॅस दरात प्रति किलो २ रुपये ४९ पैशांची दरवाढ करण्यात आली आहे. त्यामुळे रिक्षा, टॅक्सी, बेस्टला यांच्या प्रवासी भाडेवाढीसह घरगुती बजेटही कोलमडणार आहे. बेस्ट, रिक्षा आणि टॅक्सीला सीएनजीसाठी प्रतिकिलो ४३.४५ रुपये आणि घरगुती वापराच्या गॅससाठी प्रतिकिलो २६.५८ रुपये मोजावे लागणार आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मिलीयन ब्रिटीश टर्मिनल युनिटमागे झालेल्या दरवाढीमुळे केंद्र शासनाने मुंबईत ही दरवाढ केली आहे. याबाबत ए.एल.क्वाड्रोस यांनी सांगितले की, मंगळवारी महानगर गॅस लिमिटेडला दर कमी करण्यासंदर्भातले निवेदन देण्यात येईल. यावर होणाऱ्या निर्णयानंतर संपावर जाण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र निर्णय न झाल्यास संपावर जावूच, असे क्वाड्रोस यांनी सांगितले.