स्टॅन स्वामी यांची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
स्टॅन स्वामी यांची जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव
एल्गार परिषद प्रकरण
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एल्गार परिषद व शहरी नक्षलवादप्रकरणी आरोपी असलेले स्टॅन स्वामी (वय ८३) यांनी प्रकृतीच्या कारणास्तव उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली आहे. सत्र न्यायालयाने गेल्या महिन्यात स्टॅन स्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला.
वय आणि अनेक व्याधींचे कारण देत स्टॅन स्वामी यांनी जामिनावर सुटका करण्याची विनंती उच्च न्यायालयाला केली आहे. गेल्या महिन्यात सत्र न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. स्टॅन स्वामी यांचे वय किंवा प्रकृती या आधारावर त्यांची जामिनावर सुटका करू शकत नाही; कारण त्यांच्याविरोधात सकृतदर्शनी सरकार उलथवण्याचा कट रचल्याच्या आरोपांबाबत पुरावे आहेत, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला होता.
स्वामी यांनी याचकेत म्हटले आहे की, नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात ४० पेक्षा अधिक कैद्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे आपल्यालाही कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो.
स्वामी यांना ८ ऑक्टोबर २०२० रोजी रांची येथील त्यांच्या राहत्या घरातून अटक करण्यात आली. ३१ डिसेंबर २०२० रोजी पुणे येथे एल्गार परिषद घेण्यात आली. या परिषदेच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे १ जानेवारी २०१८ रोजी कोरेगाव-भीमा येथे जातीय दंगल उसळली.