मुंबई- विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची सरकारविरोधात घोषणाबाजी केली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरून विरोधक आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर बसून 'स्थगिती सरकार हाय हाय' अशा घोषणाबाजी करण्यात आली. तसेच माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.
हे गद्दारांचं सरकार आहे. बेकायदेशीर सरकार आहे, ते कोसळणारच. लोकशाहीचा खून करणाऱ्यांविरोधात उभे राहू. आम्ही महाराष्ट्र म्हणून एकजुटीने उभे आहोत. हुकूमशाही सरकारचा विरोध करत आहोत, असं आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन बुधवारपासून सुरू होत असून राज्यातील अतिवृष्टीने झालेले नुकसान, आधीच्या निर्णयांना दिलेली स्थगिती यावरून सरकारला घेरण्याची रणनीती विरोधकांनी आखली आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकत विरोधकांनी संघर्षाची नांदी दिली.
विधान परिषद विरोधी पक्षनेतेपदावरून विरोधकांमधील मतभेदही समोर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना अधिवेशनात चर्चेचे आवाहन करताना सरकार गेल्यामुळे विरोधी पक्षनेते अजित पवार अस्वस्थ आहेत, कारण सरकार तेच चालवायचे अशी टीकादेखील केली.