मुंबई : सुटीच्या निमित्ताने पतीसोबत मुंबई फिरण्यासाठी रेल्वेने निघालेल्या महिला पोलिसाला दरवाजात उभे राहून प्रवास करणे जीवावर बेतले आहे. फूट बोर्डवरून पाय घसरून त्या खाली कोसळल्या. त्यांना वाचविण्यासाठी पतीनेही खाली उडी घेतली. मात्र, डाऊन लोकलचा धक्का लागून अश्विनी भाऊसाहेब डोमाडे यांचा मृत्यू झाला.
रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कळवा परिसरात राहणाऱ्या अश्विनी यांचा २०२१ मध्ये विवाह झाला. महिन्याभरापूर्वी ट्रेनिंग पूर्ण करत त्या ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात रुजू झाल्या होत्या. मंगळवारी साप्ताहिक सुटी असल्याने पतीसोबत मुंबईला फिरण्यासाठी दुपारी दीडच्या सुमारास कळवा रेल्वे स्टेशन येथे आलेल्या अप सीएसएमटी लोकलच्या फर्स्ट क्लास डब्यात त्यांचे पती राजेंद्र पालवे यांच्यासोबत चढल्या. लोकलच्या दरवाजात उभे राहून प्रवास करत असताना, गाडी नाहूर रेल्वे स्टेशन येथे थांबून सुरू होताच, अश्विनी यांचा फूट बोर्डवरून पाय घसरून, तोल गेला. पतीने हात धरून त्यांना ओढण्याचा प्रयत्न करताच त्याच दरम्यान ट्रॅक क्रमांक ३ वरून आलेल्या डाऊन लोकलचा धक्का लागून त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांना नाहूर रेल्वे स्टेशनवरील पोलिसांनी तत्काळ फोर्टिस हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, त्यापूर्वीच त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या घटनेने कुटुंबीयांना धक्का बसला आहे. शवविच्छेदानासाठी त्यांचा मृतदेह राजावाडी रुग्णालयात नेण्यात आला. याप्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिस ठाण्यात नोंद करत पोलिस अधिक तपास करत आहे.
पतीचीही पोलिस भरतीसाठी तयारीअश्विनी यांचे पती खासगी कंपनीत नोकरी करतात. त्यांचीही पोलिस भरतीसाठी तयारी सुरू आहे. या घटनेने पालवे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.