स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 12:56 AM2020-02-27T00:56:53+5:302020-02-27T00:57:13+5:30

कोंडी करण्याचे सेनेचे मनसुबे; बहुमताच्या जोरावर उपसूचना फेटाळल्या

Standing committee chairperson and BJP corporators | स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी

स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी

Next

मुंबई : नेतृत्वाअभावी पहारेकऱ्यांची महापालिकेत कोंडी करण्याचे मनसुबे शिवसेनेने आखले आहेत. त्यानुसार भाजपने मांडलेल्या उपसूचना बहुमताच्या जोरावर फेटाळल्या जात आहेत. यामुळे भाजपच्या गोटात नाराजीचा सूर उमटत आहे. उभय पक्षांमधील या वादाचा स्फोट स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी झाला. भाजपच्या नगरसेविका आणि स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.

राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर महापालिकेतही शिवसेनेची ताकद वाढली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी - समाजवादीच्या सदस्यांची मते शिवसेनेच्या पारड्यात पडत आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रस्तावावर आपला मुद्दा मांडताना भाजप एकाकी पडत आहे. त्यात भाजपचे गटनेते मनोज कोटक खासदार बनल्यामुळे महापालिकेच्या कामकाजातून त्यांनी लक्ष काढून घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे नेताच नसल्याने भाजप सदस्यांना सत्ताधारी जुमानत नसल्याचे दिसते.

गेल्या काही बैठकांमध्ये याची प्रचिती आल्यानंतर बुधवारी स्थायी समिती अध्यक्ष आणि भाजप नगरसेवकांमध्ये खडाजंगी झाली. धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीबाबत सुरू असलेल्या चर्चेत भाजपच्या नगरसेविका ज्योती अळवणी आणि राजश्री शिरवाडकर आमने-सामने आल्या.

हा वाद वाढतच गेल्याने अध्यक्षांनी दोन्ही नगरसेविकांना सुरक्षारक्षकांमार्फत स्थायी समितीतून बाहेर काढण्याची धमकी दिली. यामुळे त्यांचा पारा आणखी चढला. मात्र अध्यक्षांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत कामकाज तसेच सुरू ठेवले.

सभाशास्त्राचे भाजप नगरसेविकांना ज्ञान नाही का? अध्यक्षांवर अशा पद्धतीने ओरडून बोलणे योग्य नाही. हा अध्यक्षांचा अपमान आहे, अशी नाराजी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केली.

चिटणीस खात्याच्या प्रमुखांना घेराव!
भाजपच्या महिला नगरसेवकांचा वाद सुरू असताना स्वपक्षीय पुरुष नगरसेवकांनी काढता पाय घेतला. त्यामुळे एकट्या पडलेल्या शिरवाडकर आणि अळवणी यांनी बैठक संपल्यानंतर पालिकेच्या चिटणीस खात्याचे प्रमुख यांना घेराव घातला.
सदस्याला बाहेर काढण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे का? असा सवाल केला. मात्र हा वाद सुरू असताना शिवसेना नगरसेविका राजुल पटेल चिटणिसांच्या मदतीला धावून आल्या. मात्र त्या वेळी भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक तिथे नव्हते. स्थायी समिती सदस्याला सुरक्षारक्षकामार्फत बाहेर काढण्याचे अधिकार अध्यक्षांना कोणी दिले? अशा पद्धतीने महिला नगरसेविकांचा अपमान करणे योग्य नाही, अशी नाराजी भाजप नगरसेविकांनी व्यक्त केली.

Web Title: Standing committee chairperson and BJP corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.