ठाणे : येणारे वर्ष निवडणूक वर्ष असल्याने या काळात स्थायी समितीच्या चाव्या कोणाच्या हाती राहणार, याबाबत शिवसेना-भाजपा युतीतील सस्पेन्स संपला आहे. आधी दिलेल्या आश्वासनानुसार हे पद यंदा भाजपाकडे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. शुक्रवारी शेवटच्या दिवशी त्या पक्षातर्फे संजय वाघुले यांनी अर्ज भरला. राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे प्रमिला केणी यांनीही अर्ज दाखल केला. ही निवडणूक सोमवारी होणार आहे. युतीचे ९ तर आघाडीचे ७ अशी सदस्य संख्या असल्याने सभापतीपदाच्या निवडीत मोठी चुरस आहे. महापालिकेच्या सत्तास्थापनेच्या तडजोडीत पाच वर्षांत एकदा स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाला देण्याचे ठरले होते. त्यानुसार, मागील वर्षीच सभापतीपद देण्याचा शब्द शिवसेनेने भाजपाला दिला होता. परंतु, ऐनवेळी शिवसेनेने स्थायीच्या चाव्या आपल्याकडे ठेवल्या होत्या. त्यानंतर, शेवटच्या वर्षी हे पद भाजपाला दिले जाणार होते. परंतु, विधानसभा, त्यानंतर झालेल्या कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना-भाजपामध्ये सामना रंगल्याने त्याचे पडसाद या निवडणुकीत उमटतील, अशी शक्यता होती. ठाणे पालिका निवडणुकीत शिवसेना-भाजपा स्वतंत्रपणे लढणार असल्याने निवडणूक वर्षातील स्थायी समितीचे सभापतीपद भाजपाकडे देण्यास शिवसेनेचे नेते राजी होतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. भाजपाच्याच काही मंडळींनी वाघुले यांना सभापतीपद मिळू नये म्हणून शिवसेनेच्या काही नेत्यांकडे फिल्डिंग लावल्याचेही बोलले जात होते. त्यामुळे उमेदवारी अर्ज भरेपर्यंत शिवसेनेचा कौल कोणाला, हे सांगणे कठीण होऊ बसले होते. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी युतीचे उमेदवार म्हणून वाघुले यांनी अर्ज भरल्याने सर्व चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रमिला केणी आणि वाघुले यांच्यात सोमवारी लढत होईल.
ठाण्याची स्थायी समिती भाजपाकडेच
By admin | Published: April 02, 2016 2:11 AM