मुंबई - देशातील श्रीमंत महापालिकेची आर्थिक नाडी हाती असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक वर्षांनंतर तिरंगी लढत होणार आहे. आतापर्यंत पहारेकऱ्यांच्या भूमिकेत असलेल्या भाजपाने यावर्षी समिती निवडणुकांमध्ये आपला उमेदवार उभा केला आहे. तर राज्यात शिवसेनेबरोबर सत्तेत असलेल्या काँग्रेसने महापालिकेत स्थायी व शिक्षण या दोन्ही समित्यांसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल करीत शिवसेनेला धक्का दिला.
पालिकेतील स्थायी, सुधार, शिक्षण आणि 'बेस्ट' या वैधानिक समित्या, सहा विशेष, १८ प्रभाग समित्यांच्या निवडणुका दरवर्षी एप्रिल महिन्यात घेतल्या जातात. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका सहा महिने लांबणीवर पडल्या. परंतु या समित्यांचा कार्यकाळ संपुष्टात आल्याने नवीन समितीची बैठक निवडणुकीअभावी अद्याप होऊ शकलेली नाही. त्यामुळे अनेक विकासकामं खोळंबली असल्याने राज्य सरकारने या समित्यांच्या निवडणुका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यास परवानगी दिली आहे.
त्यानुसार स्थायी समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून यशवंत जाधव यांनी तिसऱ्यांदा तर शिक्षण समिती अध्यक्षपदासाठी संध्या दोशी यांनी पालिका चिटणीस संगीता शर्मा यांच्याकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. विरोधी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादी-समाजवादीकडून स्थायी समितीसाठी आसिफ झकेरिया आणि शिक्षण समितीकरिता संगीता हांडोरे यांनी अर्ज दाखल केला. तर भाजपकडून स्थायी समितीसाठी मकरंद नार्वेकर, शिक्षण समितीसाठी सुरेखा पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.
शिवसेनेचे संख्याबळ अधिक, पण
स्थायी समितीत शिवसेनेचे १२, भाजपा १०, काँग्रेस ३, राष्ट्रवादी, सपाचे प्रत्येकी १ सदस्य आहेत. शिक्षण समितीत शिवसेना ११, भाजप ९, काँग्रेस ४, राष्ट्रवादी, सपाचे प्रत्येकी १ आणि शिवसेना नामनिर्देशित २ आणि भाजप १ असे सदस्य आहेत. त्यामुळे संख्याबळ अधिक असल्याने शिवसेनेचा विजय निश्चित आहे. परंतु भाजपाने शिवसेनेला मात देण्यासाठी ऐनवेळी काँग्रेसला पाठिंबा दिल्यास शिवसेनेची अडचण वाढणार आहे. तर विशेष आणि प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळविण्यासाठी काँग्रेसचे हे दबावतंत्र असल्याचेही राजकीय सूत्रांकडून समजते.