मालाडमधील ५०० झाडांवरून तरुणाईने काढल्या स्टेपलर पिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2018 04:53 AM2018-08-20T04:53:13+5:302018-08-20T04:53:27+5:30
मालाड पूर्वेकडील रेल्वे स्थानक ते दत्त मंदिर रोड येथील झाडांवरील खिळे, तारा आणि स्टेपलर पिनांपासून मुक्त करण्याचे अभियान राबविण्यात आले.
मुंबई : गेल्या चार महिन्यांपासून ‘आंघोळीची गोळी’ संस्थेसह इतर सामाजिक संस्था ‘खिळेमुक्त झाडे’ या अभियानांतर्गत झाडांना मारण्यात आलेले खिळे, तारा आणि स्टेपलर पिनांपासून मुक्त काढण्याचे काम तरुणाई करत आहे. मालाड पूर्वेकडील रेल्वे स्थानक ते दत्त मंदिर रोड येथील झाडांवरील खिळे, तारा आणि स्टेपलर पिनांपासून मुक्त करण्याचे अभियान रविवारी राबविण्यात आले. अभियानांतर्गत २८ झाडांना खिळेमुक्त केले, तसेच जवळपास ५०० स्टेपलरच्या पिना झाडांच्या खोडातून काढण्यात आल्या. अभियानामध्ये कॉलेजियन्सने सहभाग घेतला होता. झाडांना स्टेपलर पिन मारून जाहिरातदार अगदी सहजपणे झाडांवर अनधिकृतरीत्या जाहिराती करतात, तसेच काही ठिकाणी असे दिसून आले की, खिळे व स्टेपलर पिन मारून जाहिरात केलेले फलक कित्येक महिने तिथेच झाडावर लटकलेले असतात. महाराष्ट्र डीफेसमेन्ट अॅक्ट १९९५ नुसार अशा बेकायदेशीर जाहिरातींवर कारवाई करून खटले दाखल करणे अपेक्षित असताना, महापालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही, अशी खंत ‘आंघोळीच्या गोळी’चे सदस्य नामदेव येडगे यांनी व्यक्त केली. दरम्यान, निदान झाडांवरच्या जाहिराती आणि खिळे आपण काढून घ्यावेत व कायदेशीर कारवाईपासून आपला बचाव करून मालाड स्वच्छ ठेवण्यास मदत करावी, असे विद्यार्थ्यांनी नागरिकांना आवाहन केले.