लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : एमएमआरडीए क्षेत्रातील सर्व मेट्रोंची कामे पूर्ण होण्याचे वेळापत्रक नव्याने तयार करा. या कामांना विलंब चालणार नाही. पुढच्या वर्षीपासून दरवर्षी किमान ५० किमी मेट्रो कार्यान्वित होतील, असे नियोजन करा, असे आदेश मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या सह्याद्री अतिथीगृह येथील आढावा बैठकीत दिले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित होत्या.
फडणवीस म्हणाले, अनेक ठिकाणी कारशेडशिवाय मेट्रो सुरू होत आहेत. त्यामुळे मेट्रो सुरू करण्यासाठी त्याकरिता थांबू नका. जगात असे प्रयोग होत आहेत, त्यांचा अभ्यास करा. त्याला तात्पुरत्या पर्यायी व्यवस्था काय आहेत, याचा आढावा घ्या. भविष्यातील सर्व संभाव्य मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेत कारशेडसाठी जागा आतापासूनच आरक्षित करा. पुढच्या वर्षीपासून ५० किमी मेट्रो दरवर्षी सुरू होईल, याबाबत नियोजन करा. यावर्षी किमान २३ किमी मेट्रो सुरू होईल. तसेच मेट्रो-३ मुळे २० ते २५ किलोमीटरची त्यात आणखी भर पडेल.
स्मारकांबाबत...
इंदू मिल येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक डिसेंबर २०२५ अखेरीस पूर्ण करा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मारकाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, या दोन्ही प्रकल्पांच्या वार्षिक देखभालीसाठी आराखडा आताच तयार करण्याच्या सूचना फडणवीस यांनी दिल्या.
३,५०० किमी रस्त्यांचा विकास होणार; नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई: राज्यातील लहान-मोठ्या शहरांना जोडणाऱ्या साडेतीन हजार किलोमीटरच्या रस्त्यांचा विकास करण्यात येणार आहे. राज्यातील दहा लाखांवरील शहरांत नागरी संकल्प प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी नगर विकास विभागाच्या आगामी शंभर दिवसांच्या नियोजनाबाबत आढावा बैठक घेतली. त्यावेळी नगर विकास विभागातर्फे झालेल्या सादरीकरणात ही माहिती देण्यात आली.
- राज्यातील विविध नियोजन प्राधिकरणांचे सक्षमीकरण करून त्यांचे कामकाज कंपनीच्या धर्तीवर करावे, अशा सूचना मुख्यमंत्री फडणवीस
- यांनी दिल्या.
- सह्याद्री अतिथिगृहावर झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री पंकज भोयर, आदी उपस्थित होते.
- इमारत परवाने देण्याच्या प्रक्रियेचे संगणकीकरण करणे, पर्यटन धोरणानुसार एकत्रित नागरी विकास आणि नियंत्रण नियमावलीत बदल करण्याबाबतची माहिती विभागातर्फे यावेळी देण्यात आली.
चित्रपटगृहांची संख्या वाढवा
- राज्यातील प्रत्येक शहरात चित्रपटांसाठीची थिएटरची संख्या वाढण्याची गरज आहे.
- यासाठी सध्या असलेल्या सिंगल स्क्रीन थिएटरना काही सवलती देता येईल का, तसेच मराठी नाटक आणि चित्रपट एकाच थिएटरमध्ये दाखवता येईल, का याबाबत विचार करावा, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.