Join us

उपनगरात कॅन्सर रुग्णालय सुरू करा; भाजपा आमदाराचं मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2022 11:26 AM

ज्या हेतून सेव्हन हिल्स कंपनीला हे रुग्णालय चालवण्यास दिले होते, त्याच हेतूप्रमाणे सदर रुग्णालय महापालिकेने स्वत: चालवणे आवश्यक आहे असं भाजपानं म्हटलं आहे.

मुंबई - सध्या कर्करोगाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी एकमेव टाटा रुग्णालय असून सर्व सामान्य गरीबांना या रुग्णालयांमध्ये दाखल होताना अनेक अडचणींचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे महापालिकेने  केईएम, शीव, नायर व कुपरच्या धर्तीवर अंधेरीतील सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये वैद्यकीय महाविदयालयासह कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु करण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी भाजपा आमदार अमित साटम यांनी महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना पत्रद्वारे केली आहे. 

अमित साटम यांनी पत्रात लिहिलंय की, कोविडच्या महामारीत अनेक रूग्णालयांनी प्रामाणिकपणे सेवा दिली. अनेकांचे प्राण वाचवले. त्यात अंधेरी मरोळ भागातील सेव्हन हिल्स या रूग्णालयाचे अग्रक्रमाने नाव घ्यावे लागेल. कोविड काळात महापालिकेने हे रूग्णालय महापालिकेने ताब्यात घेतले होते. मागील काही महिन्यांपासून मुंबईतील कोविड रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. आता आठ कोविड सेंटर बंद करण्यात आले आहेत असं त्यांनी सांगितले. 

पंरतु आताही सेव्हन हिल्स हे कोविड रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे. पंरतु ज्या हेतून सेव्हन हिल्स कंपनीला हे रुग्णालय चालवण्यास दिले होते, त्याच हेतूप्रमाणे सदर रुग्णालय महापालिकेने स्वत: चालवणे आवश्यक आहे. ते म्हणजे २००४ च्या ठरावानुसार  महापालिकेच्या भूखंडावर १३०० खाटांचे कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रूग्णालय बांधून चालविण्यास सदर कंपनीला दिले होते. यापूर्वीही या जागेवरील अर्धवट वास्तू उभारण्यात आली होती, त्यामागेही कर्करोग रुग्णालय बांधणे हाच मूळ हेतू होता. आता सेव्हन हिल्स रुग्णालयाची वास्तू पूर्णत: बांधून तयार आहे, तसेच यासाठी लागणारे मनुष्यबळही  उपलब्ध आहे. त्यामुळे या रुग्णालयाचे रुपांतर कर्करोग व मल्टीस्पेशालिटी रुग्णालयामध्ये करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने त्याप्रमाणे निर्णय घेत कार्यवाही करावी आणि जनतेला आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी असं भाजपानं म्हटलं आहे. 

दरम्यान, या रुग्णालयामध्ये  कॅथ लॅब, रेडिएशन थेरेपी, न्यूक्लियर मेडिसीन, नेप्रोलॉजी एन्डोक्रीनॉलॉजी, न्युअलॉजी आदी प्रकारच्या आरोग्य विषयक सेवा सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे कर्करोग, हृदय विकार, किडणी, मेंदू, डायबेटीज, थायरॉईड आदी गंभीर आजारांवर यामुळे उपचार करता येवू शकतो असंही साटम यांनी सूचवलं आहे. 

टॅग्स :अमित साटमभाजपामुंबई महानगरपालिका