Join us

पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे प्रत्यक्ष वर्ग सुरू करा ....!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2021 4:05 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मागील दीड वर्षांहून अधिक काळ राज्यातील सर्वच विद्यापीठातील, महाविद्यालयातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण हे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मागील दीड वर्षांहून अधिक काळ राज्यातील सर्वच विद्यापीठातील, महाविद्यालयातील सर्व प्रकारच्या अभ्यासक्रमांचे शिक्षण हे ऑनलाइन पद्धतीने होत आहे; मात्र राज्यातील पशुवैद्यकीय अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिकविण्या थांबवून आम्हाला ऑफलाइन पद्धतीने प्रत्यक्षात शिकविण्या द्याव्यात, प्रात्यक्षिक आणि त्याचे सराव करून द्यावे, अशी मागणी करणारे पत्र अधिकृत व्यवस्थापनाला लिहिले आहे. माणसांच्या जीवा इतकेच पशुधनही महत्त्वाचे असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचे योग्य ज्ञान, शिक्षण न मिळाल्यास भविष्यात त्याचा दुष्परिणाम होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर प्रत्यक्ष पद्धतीने पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे वर्ग सुरू करण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.

राज्यात नागपूर येथील महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठांतर्गत मुंबई, परभणी, शिरवळ ,उदगीर आणि अकोला येथे पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाची महाविद्यालये कार्यरत आहेत. प्राण्यांवर उपचार करणे, त्यांचे संगोपन करणे, प्राणी व्यवस्थापन करणे, शेतीच्या कामातील पशुपालनाची आवश्यकता आणि वन्यजीव व्यवस्थापन या सगळ्या गोष्टी पाच वर्षांचा पशुवैद्यक अभ्यासक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिकविल्या जातात. विशेषतः अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात या सगळ्यांची प्रात्यक्षिके देऊन विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम सहज केला जातो; मात्र सद्यस्थितीत आभासी व ऑनलाइन पद्धतीने शिकविल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमात या सगळ्यांची समज येणे विद्यार्थ्यांना अवघड जात असल्याच्या प्रतिक्रिया विद्यार्थी देत आहेत. अंतिम वर्षातील प्राण्यांवरील शस्त्रक्रिया, वैद्यकीय उपचारांसाठी विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक सरावाची व अनुभवाची आवश्यकता असल्याची प्रतिक्रिया मुंबईतील पशुवैद्यकीय अभ्यासक्रमाचे विद्यार्थी देत आहेत.

ज्याप्रमाणे वैद्यकीय क्षेत्राचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मानवी औषधांची योग्य माहिती असणे आवश्यक आहे, तसेच देशातील पशुधन वाचविण्यासाठी आणि संवर्धनासाठी या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनाही या अभ्यासाचे पूर्ण ज्ञान असणे आवश्यक असल्याचे ते सांगतात. भविष्यात या पदवीधारक विद्यार्थ्यांना सराव नसल्यास पशुधन आणि पर्यायाने त्यावर अवलंबून असणाऱ्या क्षेत्रावर विपरित परिणामाची भीती ते व्यक्त करीत आहेत. पशुधनाचे व्यवस्थापन आणि निर्मिती यावर ग्रामदिन अर्थाजन आणि शहरी अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग अवलंबून असल्याने याकडे दुर्लक्ष करून चालणार नसल्याची प्रतिक्रिया मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातील अंतिम वर्षाचा विद्यार्थी सुंदरचेलवन सुब्रम्हण्यम याने दिली. त्यामुळे आम्हा विद्यार्थ्यांच्या ऑफलाइन शिकवण्या, वर्ग सुरू करून याला उपस्थित राहण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचीही परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी शासनाकडे केली आहे.