Join us  

बम्बार्डियर लोकल सुरू करा

By admin | Published: February 18, 2015 1:23 AM

उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेत नवीन बम्बार्डियर लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या नवीन लोकलला रेल्वे अर्थसंकल्पानंतरचा मुहूर्त देण्यात आला आहे.

मुंबई : उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेत नवीन बम्बार्डियर लोकल सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू असून या नवीन लोकलला रेल्वे अर्थसंकल्पानंतरचा मुहूर्त देण्यात आला आहे. तत्पूर्वी रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून या लोकलचा अहवाल आणि शिफारस रेल्वे बोर्डाकडे जाणे बाकी होते. त्यानुसार अहवाल रेल्वे बोर्डाला सादर करण्याबरोबरच ‘बम्बार्डियर लोकल सुरू करा’ अशी शिफारस रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून रेल्वे बोर्डाकडे नुकतीच करण्यात आली आहे. बम्बार्डियरच्या ७२ पैकी दोन लोकल आॅक्टोबर आणि नोव्हेंबर २0१३मध्ये दाखल झाल्या. त्यांची रेल्वे अधिकाऱ्यांकडून चाचणी घेण्यात आल्यानंतर पश्चिम रेल्वेवर या लोकल सुरू करण्यासाठी २0१४ मध्ये सहा मुहूर्त निवडण्यात आले. परंतु अनेक तांत्रिक कारणांमुळे त्याचा मुहूर्त पुढे ढकलण्यात आला. अखेर रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी बम्बार्डियर लोकलची नुकतीच अखेरची चाचणी घेत लोकलचा वेग, प्लॅटफॉर्म आणि लोकलमधील गॅप आणि अन्य तांत्रिक चाचण्यांची माहितीही घेतली आणि चाचणी यशस्वी झाल्याचे सांगत हिरवा कंदीलही दिला. मात्र रेल्वे बोर्डाकडून काही तांत्रिक अहवाल आल्यानंतर आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केलेल्या चाचणीचा अहवाल तसेच शिफारस रेल्वे बोर्डाला पाठविल्यानंतरच या लोकल सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार रेल्वे बोर्डाकडून तांत्रिक अहवाल एमआरव्हीसीला आणि रेल्वे सुरक्षा आयुक्तांना प्राप्त झाला. त्यानंतर दोन्ही लोकल साधारणपणे एक महिन्यात म्हणजे २६ फेब्रुवारी या रेल्वे अर्थसंकल्पानंतर सुरू होतील, असे रेल्वेकडून स्पष्ट करण्यात आले. तत्पूर्वी रेल्वे बोर्डाकडून तांत्रिक अहवाल प्राप्त झाल्यामुळे रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी बम्बार्डियर लोकलचा चाचणी अहवाल रेल्वे बोर्डाकडे दहा दिवसांपूर्वी पाठविला आहे. या अहवालाबरोरच दोन्ही लोकल पश्चिम रेल्वे मार्गावर सुरू करण्यात याव्यात, अशी शिफारसही रेल्वे बोर्डाला सादर केल्याचे रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले. त्यामुळे आता सर्वस्वी निर्णय रेल्वे बोर्ड घेईल, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)च्एमआरव्हीसीमार्फत बम्बार्डियर कंपनीच्या ७२ लोकल मुंबईच्या उपनगरीय प्रवाशांसाठी येणार आहेत. च्या सर्व लोकलची बांधणी चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटिग्रल कोच फॅक्टरी) केली जात आहे.