सोळा जिल्ह्यांतील उद्योगधंदे सुरू करावेत; उद्योग खात्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2020 07:05 AM2020-04-14T07:05:34+5:302020-04-14T07:05:40+5:30

मुख्यमंत्र्यांकडून आज निर्णयाची अपेक्षा : अर्धे राज्य मूळपदी येण्यास होणार मदत

To start businesses in sixteen districts; Industry Department Recommendation | सोळा जिल्ह्यांतील उद्योगधंदे सुरू करावेत; उद्योग खात्याची शिफारस

सोळा जिल्ह्यांतील उद्योगधंदे सुरू करावेत; उद्योग खात्याची शिफारस

Next

अतुल कुलकर्णी 

मुंबई : कोरोनाबाधित नसलेले अथवा केवळ एकच रुग्ण असलेल्या राज्यातील १६ जिल्ह्यांत उद्योगधंदे सुरू करता येतील, अशी शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्याचा निर्णय उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण नसलेले ७ तर फक्त एकच रुग्ण असणारे ९ जिल्हे असल्याने ३५ पैकी १६ जिल्ह्यांमध्ये शेतीवर आधारित उद्योग तातडीने  सुरू करता येऊ शकतील. पाचपेक्षा कमी रुग्ण असणारे ४ जिल्हे आहेत, २१ तारखेपर्यंत ते निरीक्षणाखाली ठेवावेत व त्यानंतर त्यांनाही तशी परवानगी द्यावी. यामुळे अर्धे राज्य तातडीने मूळ पदावर येण्यास मदत होईल, असेही सुचविले आहे. हे मान्य झाल्यास १६ जिल्ह्यांत १५ तारखेपासून तर ४ जिल्ह्यांत व्यवहार २१ तारखेपासून पूर्वपदावर येतील. नंदूरबार, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, वर्धा, नांदेड व परभणी या सात जिल्ह्यांत एकही कोरोनाचा रुग्ण नाही. धुळे, जळगाव, सोलापूर, सिंधुदुर्ग, जालना, हिंगोली, बीड, वाशिम व गोंदिया या ९ जिल्ह्यांत फक्त एकच रुग्ण आढळला. त्यामुळे इथेही जिल्हा बंदी कायम ठेवून उद्योग व शेतीवर आधारित उद्योग सुरू करण्यास मान्यता देण्याची शिफारस बैठकीत केली.
उस्मानाबाद, यवतमाळ, पालघर व रायगड या चार जिल्ह्यांत रुग्णसंख्या ५ च्या आत असल्याने येथील रुग्णांचे प्रमाण २१ एप्रिलपर्यंत तपासून रुग्ण न वाढल्यास उद्योग सुरू करण्याची शिफारस केली आहे.

धान्य मार्केटमधील व्यापारी प्रतिनिधी, कामगार नेते नरेंद्र पाटील व शशिकांत शिंदे यांच्यासह बाजार समिती अधिकाऱ्यांची बैठक सोमवारी झाली. सर्वांना मान्य होईल अशी नियमावली बनवून मंगळवारी कोकण आयुक्त शिवाजी दौंड यांच्याकडे बैठक होईल. नंतरच या मार्केटबाबत निर्णय होईल.

भाजीपालासह कांदा मार्केट उद्यापासून सुरू होणार
नवी मुंबई : कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट बंद असल्याने मुंबईत गरजेच्या वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे मार्केट सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. भाजीपाला व कांदा मार्केट १५ एप्रिलपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फळ मार्केट सुरू करण्याबाबत मंगळवारच्या बैठकीत निर्णय होणार आहे.

मुंबई, ठाणेसह नवी मुंबई परिसर रेड झोनमध्ये गेला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाचही मार्केट बंद करण्याचा निर्णय कामगार व व्यापाऱ्यांनी घेतला होता. यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला होता. किराणा दुकानात गहू, ज्वारी, डाळी व कडधान्ये ही उपलब्ध होत नाहीत.

एपीएमसी बंद झाल्यास नागरिकांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे. कारण येथूनच सर्व नागरिकांना भाजीपाल्याच्या पुरवठा केला जातो. यामुळे मार्केट सुरू करण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. व्यापाºयांनी माल मागविण्यापूर्वी बाजार समितीची परवानगी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

१७ उद्योगक्षेत्रे सुरू करण्यास केंद्र सरकारची मान्यता
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने कोरोनाच्या काळामधे १७ विविध पद्धतीचे उद्योग सुरू करता येतील, असे जाहीर केले आहे. स्टील, मिश्र धातू, टेलिकॉम सामग्री, स्पिनिंग अ‍ॅण्ड जिनिंग मिल, सिमेंट प्रकल्प, कृषी प्रक्रिया उद्योग, खते आणि बियाणे, रंग, खाद्य-उद्योग आणि पेय, बियाणे, प्रक्रिया उद्योग, प्लास्टिक, जेम्स व ज्वेलरीचे उद्योग, काच, स्वयंचलित साधनांचा वापर असलेले युनिट, बांधकाम उद्योग, संरक्षण सामग्री आदींचा त्यात समावेश आहे.

एमएमआर आणि पीएमआर विभाग धोक्यात
एमएमआर विभाग म्हणजे मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा भाईंदर, वसई, पनवेल आणि पीएमआर विभाग म्हणजे पुणे शहर व जिल्हा, पिंपरी-चिंचवड हे दोन भाग तसेच नागपूर, मालेगाव, अहमदनगर, औरंगाबाद, अकोला हे जिल्हे मात्र ३० एप्रिलपर्यंत लॉकडाउनमध्येच राहतील. सांगलीच्या फक्त इस्लामपूरमध्येच रुग्ण आढळल्याने तो भाग पूर्णपणे बंद करुन बाकी जिल्ह्याचा वेगळा विचार होईल.

पुण्यात भुसार बाजार उद्यापासून सुरू होणार
पुणे : भुसार व गूळ बाजार बेमुदत बंदही मागे घेतला आहे. माल वाहतूक करणारे टेम्पोचालक व दुकान कामगार यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे आश्वासन मिळाल्यानंतर बुधवारपासून हा बाजार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे दि पूना मर्चंट चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल म्हणाले.

Web Title: To start businesses in sixteen districts; Industry Department Recommendation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.