प्रतिबंधात्मक उपाय करून वर्ग सुरू करा; विद्यापीठाच्या महाविद्यालयांना सूचना जारी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 07:28 AM2021-10-18T07:28:12+5:302021-10-18T07:28:34+5:30
महाविद्यालये सुरू करताना स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना केल्या आहेत.
मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने २० ऑक्टोबरपासून महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी जाहीर केला. त्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाने त्यांच्याशी संलग्न महाविद्यालयांना वर्ग सुरू करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. महाविद्यालये सुरू करताना स्थानिक प्रशासनाशी विचारविनिमय करून योग्य तो निर्णय घेण्याच्या सूचना मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना केल्या आहेत.
महाविद्यालयांचे वर्ग सुरू करताना ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त क्षमतेने सुरू करताना कोरोनाचा स्थानिक पातळीवरील प्रादुर्भाव व परिस्थिती, प्रतिबंधित प्रक्षेत्रांचे नियोजन व आरोग्यविषय पायाभूत सुविधांची उपलब्धता या बाबी विचारात घ्याव्यात. महाविद्यालये सुरू करण्याबाबत स्थानिक प्राधिकरणांशी विचारविनिमय करून महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. तसेच १८ वर्षांवरील ज्या विद्यार्थ्यांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत. तेच विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी महाविद्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहू शकतील, अशा सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. या सूचनांचे पालन करण्याकरिता महाविद्यालयांनी ज्या विद्यार्थ्यांनी कोविड १९ ची लस घेतलेली नाही त्यांच्यासाठी स्थानिक प्रशासनाशी समन्वय साधून लसीकरणासाठी विशेष मोहीम राबवून लसीकरण प्राधान्यांने पूर्ण करावे. तसेच महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचेही लसीकरण प्राधान्याने करून घ्यावे, अशा सूचनाही मुंबई विद्यापीठाने महाविद्यालयांना केल्या आहेत.