स्थानिक प्राधिकरणांशी चर्चा करूनच महाविद्यालये सुरू करा - मुंबई विद्यापीठ
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2021 04:48 AM2021-02-09T04:48:27+5:302021-02-09T04:48:43+5:30
मुंबई विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ कार्यक्षेत्रासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना यासंदर्भात पत्रे पाठविण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले.
मुंबई : मुंबई विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये, शैक्षणिक संस्था यांनी आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाशी विचारविनिमय करूनच महाविद्यालये, शैक्षणिक संस्था सुरू कराव्यात असे निर्देश मुंबई विद्यापीठ प्रशासनाने सर्व संलग्नित महाविद्यालय प्रशासनाना दिल्या आहेत. मुंबई विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठ कार्यक्षेत्रासाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना यासंदर्भात पत्रे पाठविण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले. मात्र असे करून मुंबई विद्यापीठ स्वतःची जबाबदारी झटकत असल्याचा आरोप बुक्टू संघटनेने केला. त्यांच्यासह शिक्षक संघटनांनी विद्यापीठाच्या या परिपत्रकाचा निषेध केला.
राज्यातील महाविद्यालये सुरू करण्यासंबंधी शासनाने काढलेल्या शासन निर्णयाचे हे उल्लंघन असल्याचा आराेप बुक्टू (बॉम्बे युनिव्हर्सिटी अँड कॉलेज टीचर्स असोसिएशन)ने केला आहे. शासन निर्णयानुसार विद्यापीठ प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व स्थानिक महानगरपालिका, जिल्हाधिकारी, प्रशासन यांच्याशी विचारविनिमय करून तसेच सुविधांची उपलब्धता विचारात घेऊन, आवश्यक उपाययोजना करूनच महाविद्यालये सुरू करण्याची कार्यवाही करायची आहे. विद्यापीठाने आपली जबाबदारी ही शैक्षणिक संस्था व महाविद्यालयांवर परस्पर ढकलली असून त्यांच्याकडूनच अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्याचा नाराजीचा सूर बुक्टूमध्ये आहे.
उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थ्यांच्या कोविड १९ च्या चाचण्यांकरिता विद्यापीठ प्रशासनाने स्थानिक जिल्हाधिकारी, पालिका, प्रशासन यांच्याशी चर्चा करायची आहे. विद्यापीठाने परस्पर जबाबदारी महाविद्यालयावर सोपविल्यास ७८० हून अधिक संलग्न महाविद्यालयात सुरक्षिततेची साधने, कोविड चाचण्या, खबरदारीच्या उपाययोजना यांचा समन्वय कसा साधला जाणार, असा सवाल बुक्टूने उपस्थित केला. विद्यापीठ जबाबदारी झटकत असल्याचा त्यांचा आराेप आहे. तर, यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
विद्यापीठ जबाबदारी झटकत असल्याचा आराेप
मार्च २०२० पासून महाविद्यालये बंद असताना सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ऑनलाइन शिक्षण पोहोचलेच यांची खात्री नाही. त्यामुळे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सूचनांनुसार विद्यापीठाने पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रम किती कमी करायचा यासंदर्भातील निर्णय घेण्याची सूचना शासन निर्णयात आहे. विद्यापीठ प्रशासन महाविद्यालय सुरू करण्यासंदर्भातील जबाबदारी झटकत असेल तर हा निर्णय कोणी व कसा घ्यायचा, असा प्रश्न उपस्थित करून विद्यापीठाने हे परिपत्रक तातडीने मागे घ्यावे आणि स्वतः निर्णय घ्यावा अशी मागणी बुक्टूचे अध्यक्ष गुलाबराव राजे, सरचिटणीस मधू परांजपे यांनी केली.