Join us

महाविद्यालय, प्रशिक्षण संस्थांमध्ये समुपदेशन केंद्र सुरु करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 1:39 AM

इंडियन मेडिकल असोसिएशनची मागणी; असोसिएशनने सुरु केली रात्रंदिवस सेवा देणारी मोफत हेल्पलाइन

मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने देशभरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालये आणि प्रशिक्षण संस्थांमध्ये रात्रंदिवस सेवा समुपदेशन केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. त्याचप्रमाणे, असोसिएशनने वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी , निवासी डॉक्टर आणि अन्य शाखांमधील वैद्यकीय तज्ज्ञांच्या मानसिक समस्यांच्या निराकरणासाठी ‘डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स’ हा उपक्रम सुरु केला आहे.

या उपक्रमाविषयी माहिती देताना इंडियन मेडिकल असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संतनू सेन म्हणाले, या उपक्रमाद्वारे कामाच्या तणावामुळे मानसिक उर्जा नष्ट होणे (बर्न आउट) मानसिक आरोग्याशी संबंधित आव्हानांवर उपाय शोधणे, निवासी आणि चिकित्सकांमधील आत्महत्येचे प्रकार रोखणे गोष्टींवर प्रतिबंध आणण्यावर लक्ष केंद्रीत करणार आहोत. समस्येसंदर्भात जागरूकता निर्माण करत आणि भावनिक स्वास्थ्यासाठी आवश्यक साधने वापरत साध्य करणार आहोत. स्व- मदतीचे प्रशिक्षण देणार असून गरजूंना मोफत हेल्प लाइन पुरवणार आहोत.

वैद्यकीय विद्यार्थी आणि डॉक्टर्समध्ये जागतिक पातळीवर हा धोका २.५ पटींनी वाढला असून २४ ते ३७ वर्ष वयोगटातील व्यावसायिकांना जास्त धोका आहे. देशातील चिकित्सकांमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणामध्ये सहभागी झालेल्यांपैकी ४५ टक्के जणांची भावनिक दमणूक सर्वोच्च होती, तर ८७ टक्के डॉक्टर्स वैयक्तिक ध्येय साकारण्याच्या बाबतीत नीचांकी पातळीवर होते. अधिक तणाव आणि जोखमीखाली काम करणाऱ्यांना आत्महत्या व मानसिक उर्जा नष्ट होण्याचा धोका संभवत असून आपत्कालीन विभाग, प्रसूती विभाग, मानसोपचार, इंटेन्सिव्हिस्ट्स (आयसीयू डॉक्टर्स) आणि भूलतज्ज्ञ या विभागांतील तज्ज्ञांचा त्यात प्रामुख्याने समावेश होतो.

आयएमए राष्ट्रीय समितीच्या अध्यक्ष डॉ. नीलिमा कदाम्बी यांनी सांगितले की, परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता ‘डॉक्टर्स फॉर डॉक्टर्स’ (डीफॉरडी) हा अभिनव उपक्रम लाँच केला असून या द्वारे शारीरिक दमणूक आणि मानसिक आरोग्य या बाबी धोरण व प्रशिक्षणांत बदल करून संपूर्ण यंत्रणेमध्ये हाताळल्या जाणार आहेत. याद्वारे वैद्यकीय विद्यार्थी, निवासी आणि चिकित्सकांमधे मानसिक स्वास्थ्य, स्थिर तसेच जुळवून घेण्याची वृत्ती रूजवली जाईल. आयएमए डीफॉरडी टीमने याआधीच बेंगळुरू, पुणे, दिल्ली, सूरत आणि कोचीन येथे वैद्यकीय व्यावसायिकांसाठी भावनिक स्वास्थ्याबाबत जागरूकता आणि स्व- मदत कार्यशाळा घेतल्या आहेत. डीफॉरडीच्या या उपक्रमाद्वारे वेळेवर सहाय्य तसेच व्यावसायिक कौन्सेलिंगही पुरवले जाणार आहे.