सप्तसुरांच्या साथीने झाला दिवाळीचा आरंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2016 01:57 AM2016-10-30T01:57:59+5:302016-10-30T01:57:59+5:30

दिवाळी म्हणजे आनंदाचा, दिव्यांचा, फटाक्यांचा, फराळाचा सण. पहाटे मुंबईसह उपनगरांमध्ये सुमधुर स्वर गुंजत होते. दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अनेक ठिकाणी ‘दिवाळी

Start of Diwali with Satpasura | सप्तसुरांच्या साथीने झाला दिवाळीचा आरंभ

सप्तसुरांच्या साथीने झाला दिवाळीचा आरंभ

Next

मुंबई : दिवाळी म्हणजे आनंदाचा, दिव्यांचा, फटाक्यांचा, फराळाचा सण. पहाटे मुंबईसह उपनगरांमध्ये सुमधुर स्वर गुंजत होते. दिवाळीच्या पहिल्या दिवसाची सुरुवात अनेक ठिकाणी ‘दिवाळी पहाट’च्या कार्यक्रमांनी झाली. शनिवारी मुंबई मंगलमय वातावरणात न्हाऊन निघाली होती. सायंकाळी भारताने सामना जिंकल्यामुळे दिवाळीचा आनंद द्विगुणित झालेला दिसला.
दिवाळीच्या पहिल्याच दिवशी घराघरांत उटण्याची आंघोळ, देवपूजा, एकत्र फराळ करण्याच्या पारंपरिकतेला अनेक घरांंमध्ये प्राधान्य देण्यात आले. चकली, कडबोळी, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे, करंजी या फराळावर ताव मारल्यानंतर लहानग्यांनी घराबाहेर पडून फटाक्यांची आतषबाजी केली. गृहिणींनी घराघरांत रांगोळीच्या सजावटीने दिवाळीच्या सणाची शोभा आणखीनच वाढविली.
भल्या पहाटे सुरांच्या मैफिली ऐकण्यासाठी रसिकांनी गर्दी केली होती. या मैफिलीमध्ये तरुणांचा सहभागही मोठ्या प्रमाणावर दिसून आला. नरकचतुर्दशीच्या पहाटेपासून विविध ठिकाणी दिवाळीनिमित्त विशेष कार्यक्रमांचेही आयोजन केले होते. काही सोसायट्यांमध्ये स्थानिक कलाकारांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सायंकाळीही अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
दिवाळीच्या शुभेच्छा फक्त आॅनलाइन न देता तरुणाईने प्रत्यक्ष भेटण्यास प्राधान्य दिले. अनेक कट्टे आज फुलले होते. पारंपरिक वेशात आलेल्या तरुणाईने सेल्फी, फोटोशूट करून सोशल नेटवर्किंग साइट्सवर फोटो अपलोड केले. सोशल मीडियावर मराठमोळ््या शुभेच्छा दिल्या जात होत्या.
दिवाळीचा पहिल्या दिवशी ‘वीकेन्ड’ आल्याने विविध खासगी आणि शासकीय कार्यालयांमध्ये दिवाळीचा मूड दिसून आला. काही ठिकाणी शुक्रवारीच दिवाळी पार्टीचे सेलीब्रेशन झाले होते. अर्धा वेळ कार्यालय सुटल्यावरही कर्मचाऱ्यांनी एकत्र दिवाळी साजरी केली. रात्री उशिरापर्यंत मुंबईत फटाक्यांची आतषबाजी सुरूच होती. भारत सामना जिंकल्यामुळे त्यात भर पडली होती. (प्रतिनिधी)

विद्यापीठात परदेशी विद्यार्थ्यांची दिवाळी
- दिवाळीचा आनंद परदेशी विद्यार्थ्यांना मिळावा यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे फोर्ट कॅम्पसमध्ये दीपोत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शास्त्रीय संगीत, भक्तीपर गीत, गझल आणि पाश्चात्त्य संगीताचे सादरीकरण केले. यावेळी परदेशी विद्यार्थ्यांना दिवाळी या सणाविषयी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी माहिती दिली. या वेळी परदेशी विद्यार्थ्यांनी आतषबाजीचा आनंद लुटला.

Web Title: Start of Diwali with Satpasura

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.