मुंबई :
महाराष्ट्र व विशेषतः मुंबई ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कर्मभूमी होती. या शहरात त्यांनी अध्ययन व अध्यापन केले. त्यांच्या कार्याच्या अनेक खुणा या शहरात आहेत. ही स्थळे सर्वांना पाहता यावी याकरिता ‘’मुंबई दर्शन’’ बससेवेप्रमाणे ‘’डॉ. आंबेडकर सर्किट दर्शन’’ अशी बससेवा सुरू करण्यात यावी, अशी सूचना राज्यपाल रमेश बैस यांनी चैत्यभूमी येथे झालेल्या सभेत केली. तसेच इंदू मिल कंपाउंड येथे आकार घेत असलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक सर्वांसाठी व विशेषतः देशातील युवकांसाठी प्रेरणास्थळ होईल, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३२ व्या जयंतीनिमित्त दादर येथील चैत्यभूमी येथे राज्यपालांनी पुष्पहार वाहून अभिवादन केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.
यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्ध वंदना करण्यात आली. राज्यपालांच्या हस्ते चैत्यभूमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले तसेच चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी राज्यपालांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित छायाचित्रांच्या प्रदर्शनाला भेट दिली. तर कार्यक्रमादरम्यान राज्यपालांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवरदान (पवित्र वस्त्र) देण्यात आले.
‘जगाला हेवा वाटेल असे स्मारक उभारू’आज भारत जगात सशक्त लोकशाही देश म्हणून उभा आहे, याचे श्रेय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्यघटनेला आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले. इंदू मिल येथे जगाला हेवा वाटेल असे स्मारक निर्माण होत असल्याचे सांगून स्मारकासंदर्भात प्रकाश आंबेडकर व आनंदराज आंबेडकर यांनी केलेल्या सूचना विचारात घेऊन स्मारकातील त्रुटी दूर करण्यात येतील, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘जगातील सर्वोत्तम देश होईल भारत’आज भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयास आली आहे याचे कारण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेले संविधान असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. डॉ. आंबेडकर यांच्या मार्गाने चालल्यास भारत जगातील सर्वोत्तम देश म्हणून उदयास येईल, असे त्यांनी सांगितले.