Join us

शिक्षण समृद्धी योजना सुरू करा!

By admin | Published: February 17, 2016 2:28 AM

केंद्र शासनाने सुरू केलेली निरंतर शिक्षण योजना २००९ सालापासून बंद पडलेली आहे. त्याअंतर्गत शिक्षण समृद्धी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी आघाडी सरकारने मंजूर

मुंबई : केंद्र शासनाने सुरू केलेली निरंतर शिक्षण योजना २००९ सालापासून बंद पडलेली आहे. त्याअंतर्गत शिक्षण समृद्धी योजना पुन्हा सुरू करण्यासाठी आघाडी सरकारने मंजूर केलेल्या प्रस्तावावर लवकरात लवकर शासन निर्णय काढण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासाठी श्रमिक मुक्ती दलाच्या नेतृत्वाखाली शिक्षण प्रेरक संघटनेने मंगळवारपासून आझाद मैदानात ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.संघटनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संभाजी पाटील यांनी सांगितले की, तत्कालीन शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी सचिवांसह संघटनेची बैठक घेतली होती. त्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत पथदर्शी प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेतला होता. याबाबत तीन-चार बैठकाही झाल्या. मात्र नंतर आचारसंहिता लागू झाली आणि निवडणुका झाल्या. नव्याने आलेल्या युती सरकारने याबाबत लवकरात लवकर शासन निर्णय काढावा, अशी मागणी पाटील यांनी केली आहे.शिक्षण समृद्धी योजनेमुळे उद्बोधनाचे काम राज्यात सुरू होते. सुमारे ७ हजार ५०० कर्मचारी निरंतर शिक्षण योजनेतून प्रौढ शिक्षणाच्या पुढील टप्प्यात साक्षरता टिकवून ठेवण्याचे काम करीत होते. सांस्कृतिक कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करून प्रौढ शिक्षण अबाधित ठेवण्याचे काम कर्मचाऱ्यांनी केले आहे. योजना सुरू करण्यासाठी शासन निर्णय घेऊन अंमलबजावणी करण्याची मागणी संघटनेने केली आहे. (प्रतिनिधी)