मुंबई : भावी नागरिक असलेल्या शालेय मुलांमध्ये पर्यावरणाबाबत संवेदनशीलता वाढवत त्याबाबत माहिती अवगत करून देण्याच्या उद्देशाने सुरू होत असलेल्या निसर्गग्यानी या उपक्रमाला नुकताच प्रारंभ करण्यात आला. स्प्राऊटस एन्व्हारयर्नमेंट ट्रस्ट, बालग्यानी फाउंडेशन आणि लोकमत यांनी संयुक्तरीत्या या उपक्रमाचे आयोजन केले आहे. राज्यपातळीवरील या उपक्रमाला सर्वप्रथम मुंबईतून सुरुवात करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना प्रदूषणाची समस्या आणि नागरिकांची कर्तव्ये आणि जबाबदारीची कितपत माहिती आहे, हे जाणून घेण्यासाठी शाळांमध्ये सर्व्हे करण्यात येत आहे. त्यासाठी इयत्ता पाचवी ते नववीतील विद्यार्थ्यांकडून एक पर्यावरणविषयक प्रश्नावली सोडवून घेतली जात आहे. माटुंगा येथील डॉन बॉस्को आणि दादर येथील राजा शिवाजी विद्यालयात सुरू झालेल्या या सर्व्हेला विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी आनंदाने आणि कुतूहलाने या सर्व्हेत सहभागी झाले.या सर्व्हेनंतर विद्यार्थांना पर्यावरणपूरक वर्तणुकीची शपथ दिली जाईल. दुसऱ्या टप्प्यात या विद्यार्थ्यांना विविध प्रकारे प्रदूषणाची कारणे, त्याचे दुष्परिणाम, ते रोखण्याचे उपाय आणि नागरिकांची कर्तव्ये, जबाबदाऱ्या याबाबतची माहिती दिली जाईल. तिसऱ्या टप्प्यात या विद्यार्थ्यांकडून या ज्ञानावर आधारित आॅनलाइन प्रश्नावली सोडवून घेतली जाईल. विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे आणि पारितोषिके देण्यात येतील, अशी माहिती बालग्यानी फाउंडेशनच्या अध्यक्षा सुजाता मराठे यांनी दिली.उपक्रमाला प्रारंभ म्हणून मुंबईत सर्व्हेला सुरुवात झाली आहे. निसर्गग्यानीचे स्वयंसेवक शाळाशाळांमध्ये जाऊन हा सर्व्हे करीत आहेत. याबाबत बोलताना ‘स्प्राऊट’चे आनंद पेंढारकर म्हणाले की, पर्यावरणासारख्या महत्त्वाच्या विषयाबाबत मुलांना कितपत माहिती आहे, हे पाहण्यासाठी शाळांमध्ये होणारा सर्व्हे अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. त्यामुळे मुलांना पर्यावरणाबाबत नेमकी कोणती माहिती पुरवणे आवश्यक आहे, हेही स्पष्ट होईल. (प्रतिनिधी)
निसर्गग्यानी उपक्रमाला उत्साहात प्रारंभ
By admin | Published: February 11, 2017 3:38 AM