आठ दिवसांच्या आत उड्डाणपूल सुरू करा!; अन्यथा बुलडोझर आणून उद्घाटन करण्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2019 12:12 AM2019-10-28T00:12:12+5:302019-10-28T00:12:32+5:30
मोठ्या प्रमाणात आंदोलक जमण्याची शक्यता असल्याने शनिवारी रात्री ९ वाजल्यापासूनच एव्हरार्डनगर येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता.
मुंबई : चुनाभट्टी ते बीकेसी हा उड्डाणपूल दीड महिन्यापूर्वीच तयार असूनदेखील अद्याप तो सर्वसामान्यांसाठी खुला करण्यात आलेला नाही. त्यामुळे हा उड्डाणपूल खुला करण्यात यावा, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आले. पण बीकेसी
येथे सिग्नल यंत्रणेचे काम अपूर्ण असल्याने वाहने उड्डाणपुलावरून जाऊ शकत नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु आठ दिवसांच्या आत हा उड्डाणपूल जनतेसाठी खुला न केल्यास बुलडोझर आणून उद्घाटन केले जाईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आमदार नवाब मलिक यांनी दिला.
पूर्व द्रुतगती मार्गावर चेंबूर, सायन आणि धारावी येथील वाहतूककोंडी कमी व्हावी यासाठी २०३ कोटी रुपये खर्च करून चुनाभट्टी ते बीकेसी दरम्यान १.६ किमीचा उड्डाणपूल मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत (एमएमआरडीए) बांधण्यात आला. हा उड्डाणपूल दीड महिन्यापूर्वीच तयार असूनदेखील केवळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना श्रेय घेण्यासाठी उड्डाणपुलाच्या उद्घाटनात दिरंगाई केली जात असल्याचा आरोप मलिक यांनी केला आहे. दिवसेंदिवस उद्घाटनाचा मुहूर्त लांबणीवर जात असल्याने रविवारी हे आंदोलन करण्यात आले.
मोठ्या प्रमाणात आंदोलक जमण्याची शक्यता असल्याने शनिवारी रात्री ९ वाजल्यापासूनच एव्हरार्डनगर येथे चोख पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. उड्डाणपुलाच्या प्रवेशाच्या ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्सची मोठी भिंत तयार करण्यात आली होती. सकाळी १०.३० वाजता राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाल्यावर पोलिसांनी त्यांना प्रियदर्शनी येथेच अडवले आणि उड्डाण पुलाजवळ जाण्यास मज्जाव केला. या वेळी नवाब मलिक जेसीबीवर चढून उड्डाणपुलाकडे जाणार होते. या वेळी पोलिसांनी त्यांना अडवून त्यांची पोलीस आयुक्त आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा घडवून आणली. चर्चा झाल्यानंतर मलिक यांनी आंदोलन मागे घेतले आणि आठ दिवसांचे अल्टिमेटम दिले. या आंदोलनामुळे पूर्व द्रुतगती मार्ग आणि सायन-पनवेल मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती.
अर्धवट कामांमुळे पूल खुला करणे अशक्य!
पावसाळ्यामुळे पुलाच्या डांबरीकरणाचे काम शिल्लक राहिले आहे. तसेच उड्डाणपुलावर सूचना फलक लावणे, सिग्नल यंत्रणा सुरू करणे याचीही कामे शिल्लक आहेत. ही कामे अर्धवट असताना पूल खुला करणे हे वाहनचालकांसाठी धोकादायक असल्याने पूल खुला करणे अशक्य असल्याचे एमएमआरडीएचे म्हणणे आहे.