ठाणे : के. जी. जोशी बेडेकर महाविद्यालयाने आयोजिलेल्या तिसऱ्या आंतरमहाविद्यालयीन वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उद्घाटन लोकमतचे निवासी संपादक नंदकुमार टेणी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग तसेच उपप्राचार्या आणि क्रीडा विभागप्रमुख आदी मान्यवरांची उपस्थिती होती. बक्षिस अथवा प्रसिद्धीसाठी न खेळता आनंद आणि व्यक्तीमत्व विकासासाठी तसेच सहृदय आणि चांगला माणूस बनण्यासाठी खेळावे त्यातून संघभावना आणि खिलाडूवृत्ती आपल्याला लाभते, असे सांगून टेणी यांनी कपिल देव, मिल्खा सिंग, गावस्कर आणि भाऊसाहेब खांडेकर यांच्या जीवनातील दुर्मीळ प्रसंग सांगून खेळाडूंना प्रेरीत केले. त्यानंतर श्रीफळ वाढवून स्पर्धांचा प्रारंभ करण्यात आला. ठाणे, नवी मुंबई आणि मुंबईच्या महाविद्यालयांमधील खेळाडू या स्पर्धांमध्ये सहभागी होणार आहेत. ‘लोकमत’ हे या क्रीडा स्पर्धांचे माध्यम प्रायोजक आहे. महाविद्यालयाचा फिरता चषक पटकविण्यासाठी ठाणे मुंबईच्या महाविद्यालयांमध्ये मोठी चुरस असते. मुलांसाठी फूटबॉल, शरीर सौष्ठव, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल तर मुले आणि मुलांसाठी खो-खो, कबड्डी, लंगडी, टेबल टेनिस, बुद्धीबळ आणि कॅरम या स्पर्धा होणार आहेत. याशिवाय, शॉट पुट, डिसकस थ्रो आणि १०० मीटर धावणे आदी मैदानी खेळांच्या स्पर्धा मुले आणि मुली या दोन्ही गटांसाठी घेण्यात येणार आहेत. या स्पर्धांत १०० हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग आहे.
इंटर कॉलेज क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ
By admin | Published: December 02, 2014 11:14 PM