मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये नवी मुंबईचा विकास झपाट्याने होत आहे. याचा परिणाम हर्बर रेल्वेमार्गावर झाल्याने पनवेलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व लोकल कुर्ला रेल्वे स्थानकात गर्दीने खच्चून भरलेल्या असतात. त्यामुळे कुर्ला ते पनवेल अशी लोकल सेवा पुन्हा सुरू झाल्यास हा ताण काही प्रमाणात नक्कीच कमी होऊ शकतो, असे हार्बरच्या प्रवाशांचे म्हणणे आहे. मध्य आणि हार्बर रेल्वेमार्गावरील महत्त्वाच्या स्थानकांमध्ये कुर्ला रेल्वे स्थानकाचा समावेश आहे. त्यामुळे हर्बर रेल्वेमार्गावरील पहिली लोकलदेखील कुर्ला-मानखुर्द अशीच सुरू करण्यात आली होती. मात्र काही वर्षांनंतर हा मार्ग पनवेलपर्यंत झाल्याने कुर्ला रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ९ आणि १० बंद करून या लोकल ७ आणि ८ या फलाटावर वळवण्यात आल्या. मात्र गेल्या काही वर्षांत नवी मुंबईचा विकास मोठ्या झपाट्याने झाला. त्यातच बीकेसी आणि पश्चिम उपनगरांत जाण्यासाठी कुर्ला स्थानकात गर्दी अधिक होऊ लागली. त्यामुळे सध्या कुर्ला रेल्वे स्थानकावरील ७ आणि ८ या हार्बरच्या फलाटांवर तोबा गर्दी असते. यात मानखुर्द, गोवंडी रेल्वे स्थानकातील प्रवाशांची संख्या सर्वाधिक आहे.सायंकाळच्या वेळेस तर सीएसटी रेल्वे स्थानकातूनच लोकल पूर्णपणे भरून येत असल्याने कुर्ला रेल्वे स्थानकात प्रवाशांना चढणेदेखील अत्यंत कठीण बनते. त्यामुळे लोकलमधून पडल्याने या फलाटांवर गेल्या काही वर्षांत अनेक अपघात झाले आहेत. प्रवाशांना या गर्दीपासून काहीसी सुटका द्यायची असेल तर रेल्वेने ९ आणि १० फलाटांवरून पुन्हा लोकल सेवा सुरू करणे गरजेचे असल्याचे २० वर्षांपासून चुनाभट्टी येथे राहणारे आत्माराम जाधव यांनी सांगितले. जाधव यांनी यासाठी सर्व रेल्वे मंत्र्यांशी वेळोवेळी पत्रव्यवहार केले आहेत. मात्र आजवर एकाही मंत्र्याने ही समस्या सोडवलेली नाही. त्यामुळे हा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी सध्याच्या रेल्वे मंत्र्यांचीही तयारी नसल्याचेच त्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
कुर्ला-पनवेल लोकल सेवा सुरू करा
By admin | Published: July 20, 2015 2:33 AM