अंधेरीचे कामगार विमा रुग्णालय लवकर सुरू करा; भिमेश मुतुला यांनी घेतली केंद्रीय मंत्र्यांची भेट
By मनोहर कुंभेजकर | Published: March 29, 2023 06:30 PM2023-03-29T18:30:54+5:302023-03-29T18:35:12+5:30
मुंबई-अंधेरी पूर्व एमआय डीसी येथील कामगार रुग्णालयाला दि,१७ डिसेंबर २०१८ साली भीषण आग लागली होती.
मुंबई - मुंबई-अंधेरी पूर्व एमआय डीसी येथील कामगार रुग्णालयाला दि,१७ डिसेंबर २०१८ साली भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत १३ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला व १५० जण जखमी झाले. तेंव्हापासून आजपर्यंत हे रुग्णालय बंदच आहे. परिणामी कामगारांच्या आरोग्याची हेळसांड होत असल्याने अंधेरीतील हे रुग्णालय लवकर सुरु करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुतुला यांनी केंद्रीय श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव व आरोग्य व कुटुंब कल्याण राज्य मंत्री भारती पवार यांनी केली आहे.या संदर्भात त्यांनी या केंद्रीय मंत्र्यांची दिल्लीत भेट घेवून त्यांना निवेदन देत सदर हॉस्पिटल लवकर सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले. लोकमत ऑनलाईन व लोकमत मध्ये सातत्याने हा विषय मांडला आहे.
सदर कामगार विमा रुग्णालय पूर्ण क्षमतेने लवकर सुरू येथे मल्टी सुपरस्पेशलिटी हॉस्पिटल बांधावे.त्यामुळे रुग्णांना छोट्या शस्त्रक्रिये पासून मोठ्या शस्त्रक्रियाला इतर रुग्णालयात न पाठवता याच रुग्णालयात दर्जेदार सुविधा येथे उपलब्ध झाली पाहिजे अशी आग्रही मागणी त्यांनी मंत्री महोदयांकडे केली.
कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या या रुग्णालयात ओपीडी,आयपीडी( ३५०बेड्स),आयसीयू आणि सुपर स्पेशालिटी सुविधा २४ तास सुरु होत्या. पॅथॉलॉजी, रेडिओल़ॉजी, एक्स-रे, सीटी-एमआरआय, ऑपरेशन थिएटसह सर्व सोयी सुविधांनी हे रुग्णालय सुसज्ज होते. ओपिडी विभागात दररोज १८०० ते २००० रुग्ण भेट देत होते, ब्ल़ड बँकेची सुविधाही उपलब्ध होती. महाराष्ट्रातील अनेक शहरातील कामगार अंधेरीच्या हॉस्पिटमध्ये उपचारासाठी येत होते. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत केल्या जात होत्या अशी माहिती त्यांनी मंत्री महोदयांना दिली.
केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी या विषयावर पुढच्या आठवड्यात वेळ ठरवून संयुक्त बैठक घेण्याचा ग्वाही दिली,तर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी सदर हॉस्पिटल सुरू करण्यात होत असलेल्या दिरंगाई बद्धल संबंधितांकडून तात्काळ अहवाल मागवला असल्याची माहिती भिमेश मुतुला यांनी दिली.
आपल्या पाठपुराव्याला यश आले असून स्वतः केंद्रीय कामगार मंत्रालयाने आपल्या सदर मागणीची दखल घेतली.तसेच येथील हॉस्पिटलच्या गैरसोयीचे मुद्दे लक्षात घेत दोन्ही मंत्री महोदयांनी आपल्या मागणीला चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे लवकरच सदर रुग्णालय सुरू होईल व कामगार विमा लाभार्थ्यांची प्रतिक्षा आता थांबेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.