नवी मुंबई : महापालिकेतर्फे नेरुळ येथे महापौर चषक हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी या स्पर्धेचे उद्घाटन महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते करण्यात आले. २० फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत महिला व पुरुषांच्या एकूण २२ संघांनी सहभाग घेतला आहे. महापालिकेच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही क्रीडा स्पर्धांच्या आयोजनावर भर दिला आहे. त्यानुसार नेरुळ जिमखाना येथे महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धा भरवण्यात आल्या आहेत. २० फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा चालणार असून त्याचा उद्घाटन समारंभ रविवारी महापौर सुधाकर सोनावणे यांच्या हस्ते झाला. याप्रसंगी आमदार मंदा म्हात्रे, क्रीडा समिती सभापती लीलाधर नाईक, नगरसेवक सुनील पाटील, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, नवी मुंबई व्हॉलीबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष किरण स्टॅनली, पंच बाबू आचरेकर, महेश खरे आदी उपस्थित होते. या स्पर्धेत पुरुषांच्या १३ तर महिलांच्या ९ संघाने सहभाग घेतला आहे. त्यामध्ये अनेक नामांकित संघ असून त्या संघांमध्ये माध्यमातून भारताचे प्रतिनिधित्व करणारे अनेक पुरुष व महिला खेळाडू स्पर्धकांचा समावेश आहे. या सामन्यांची अंतिम लढत २० फेब्रुवारी रोजी होणार असून रात्री विजेत्यांचा बक्षीस समारंभ होणार आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या संघाला, तसेच मॅन आॅफ द सिरीज व बेस्ट प्लेअर आॅफ फायनल यांनाही पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. त्यानुसार विजेत्यांना एकूण २ लाख २२ हजार रुपयांच्या रकमेची पारितोषिके दिली जाणार आहेत. (प्रतिनिधी)
महापौर चषक व्हॉलीबॉल स्पर्धेला सुरुवात
By admin | Published: February 20, 2017 6:33 AM