नवरंगांच्या उत्सवाला प्रारंभ

By admin | Published: October 2, 2016 02:28 AM2016-10-02T02:28:00+5:302016-10-02T02:28:00+5:30

मुंबईसह राज्यात शनिवारी नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. शहर-उपनगरातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये या उत्सवाचा जागर सुरू झाला आहे. शिवाय, घराघरांमध्ये घटस्थापना करण्यात

Start of Navratang festival | नवरंगांच्या उत्सवाला प्रारंभ

नवरंगांच्या उत्सवाला प्रारंभ

Next

मुंबई : मुंबईसह राज्यात शनिवारी नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. शहर-उपनगरातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये या उत्सवाचा जागर सुरू झाला आहे. शिवाय, घराघरांमध्ये घटस्थापना करण्यात आली आहे. नवरात्राच्या पहिल्याच दिवशी शहर-उपनगरात पावसाने हजेरी लावली आहे. सकाळपासूनच शहरात काही भागांमध्ये रिमझिम पाऊस पडला. जगदंबेच्या स्वागताला वरुणराजाने हजेरी लावल्याने भक्तांचा उत्साह अधिकच वाढला.
गेल्या काही वर्षांपासून या उत्सवाच्या निमित्ताने होणारी नवरंगांची उधळण शनिवारी सकाळपासूनच दिसली. शनिवारी राखाडी रंग असल्याने रस्तोरस्ती राखाडी रंगाचे पोशाख परिधान केलेले मुंबईकर दिसून आले. यात महिलावर्ग आघाडीवर होता. शहर-उपनगरातील महालक्ष्मी मंदिर, शीतलादेवी मंदिर, मुंबादेवी, गावदेवी, जाखादेवी या मंदिरांमध्येही शनिवार सकाळपासूनच भक्तांची रीघ दिसून आली. पंचमीनंतर या मंदिरांमध्ये वाढत जाणारी गर्दी लक्षात घेऊन भक्तांनी विकेंडचे औचित्य साधून दुर्गांचे दर्शन घेणे सुरू झाले आहे. नऊ दिवसांत महिषासूर राक्षासाचा वध करणाऱ्या देवीचा जागरणाचा दिवस मानला जातो. कोणत्या मंडळात सिंहासनावर तर कोणत्या मंडळात हनुमानावर बसलेली देवीची रूपे पाहायला मिळत आहेत. या आदिमायेच्या स्वागतासाठी विविध मंडळांत विशिष्ट रोषणाई, फुलांची सजावट तसेच विविध मंदिरांची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. नवरात्रीनिमित्त ठिकठिकाणी अखंड ज्योत, ध्वजपूजा, दुर्गापाठ, होमहवन इतर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
नवरात्राला सुरुवात होण्यापूर्वीच कोणत्या दिवशी कोणता रंग आहे, याची माहिती व्हॉट्सअ‍ॅप आणि इतर सोशल मीडियावर दाखल होते. यंदाही नऊ दिवसांचे रंग प्रत्येकाच्या स्मार्टफोनमध्ये दाखल झाले. या नवरंगांच्या निमित्ताने मैत्रिणींनी किंवा कुटुंबातील महिलांनी एकाच रंगाची साडी नेसून धमाल करायची, हा उद्देश मात्र साध्य होतो. शिवाय, कपाटात बंद असलेल्या साड्यांना मोकळी हवा लागते. एवढेच नाही तर नऊ दिवसांत देवीला कोणता नैवेद्य दाखवायचा याची माहितीदेखील सोशल मीडियावरून घरोघरी दाखल झाली आहे. दरम्यान दांडिया, रासगरबा खेळण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. (प्रतिनिधी)

दांडियासाठी मंडळे सज्ज
नवरात्रौत्सवात दांडिया खेळाला मोठे महत्त्व असते. या खेळात महिला, मुली मोठ्या संख्येने सहभागी होतात. यंदा विविध मंडळांनी महिलांसाठी खास दांडियांचे आयोजन केले आहे. त्यासाठी लागणाऱ्या टिपऱ्या, कपडे खरेदीसाठी बाजारात मोठी गर्दी होती.

मीडियावरही नवरंग ‘हिट’
फेसबुक, टिष्ट्वटर आणि व्हॉट्सअ‍ॅपवरही नवरंगांची उधळण होताना दिसते आहे. शनिवारपासून नेटिझन्सने आपले प्रोफाइल फोटो आणि डीपीमध्ये नवरंग अपडेट्स केलेले दिसताहेत. यात तरुणाई आघाडीवर असून नवरंग सोशल मीडियावरही चर्चेत असल्याचे दिसून येतात.

पावसामुळे उत्साहावर विरजण
तरूणाईच्या उत्साहाचे प्रतीक असलेल्या नवरात्रौत्सवात शनिवारी मात्र पावसामुळे विरजण पडले. दिवसभर पावसाची रिमझिम सुरू असताना सायंकाळी व रात्री हलक्या सरी बरसल्या. त्यामुळे गरबा खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या युवक-युवतींचा हिरमोड झाला.

Web Title: Start of Navratang festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.