नवे पी पूर्व कार्यालय येत्या 90 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

By मनोहर कुंभेजकर | Published: October 4, 2023 07:06 PM2023-10-04T19:06:56+5:302023-10-04T19:07:12+5:30

विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पी पूर्व विभाग कार्यालयाची प्रारंभिक सेवा कार्यान्वित

Start new P East office with full capacity in next 90 days, Guardian Minister Mangalprabhat Lodha directed | नवे पी पूर्व कार्यालय येत्या 90 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

नवे पी पूर्व कार्यालय येत्या 90 दिवसांमध्ये पूर्ण क्षमतेने सुरू करा, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

googlenewsNext

मुंबईबृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागातून विभाजन करुन नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पी  पूर्व विभाग कार्यालयाच्या प्रारंभिक सेवा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज सकाळी राज्याचे कौशल्य, उद्योजकता, रोजगार व नावीन्यता मंत्री व मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते पार पडला. पी  पूर्व विभाग कार्यालय अंशतः सेवांसह आजपासून कुंदनलाल सैगल नाट्यगृहात सुरु करण्यात आले असले तरी पूर्ण क्षमतेने आणि स्वतंत्र इमारतीत हे कार्यालय येत्या 90 दिवसांमध्ये सुरु करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने प्रयत्न करावेत, असे निर्देश यावेळी त्यांनी दिले.लोकमतने देखिल सातत्याने गेली अनेक वर्षे सदर विषयाला वाचा फोडून प्रशासन आणि शासनाचे लक्ष वेधले होते.

विशेष म्हणजे रोज एकमेकांवर टिका करणारे सत्ताधारी आणि विरोधक आज एकत्र कार्यक्रमाला उपस्थित होते.आज सर्व पक्षांचे नेते येथे एकत्र आले,त्यांच्यात आज सामांजस्य दिसले असे चित्र विधानसभेत व महाराष्ट्रात दिसावे अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली.

आमदार सुनील प्रभू आणि आमदार अतुल भातखळकर,खासदार गजानन कीर्तिकर,खासदार गोपाळ शेट्टी यांनी सदर विभाग कार्यालय सुरू करावे यासाठी त्यांनी विधानसभेत आणि प्रशासना बरोबर सातत्याने पाठपुरावा केल्या बद्धल मंत्री लोढा यांनी त्यांना धन्यवाद दिले. तर पी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर हे देखिल चांगले काम करत असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.हा मुंबईतील सर्वात मोठा 18 प्रभागांचा विभाग होता,कसे काय इतके दिवस हँडल केले असा सवाल त्यांनी केला.

विविध समस्या, तक्रार निवारणासाठी या कार्यालयाच्या माध्यमातून मालाड पूर्व व कुरार परिसरातील नागरिकांना मोठी मदत होईल, असेही मंत्री लोढा यांनी नमूद केले.

याप्रसंगी उत्तर पाश्चिम मुंबई लोकसभा मतदार संघाचे खासदार गजानन कीर्तिकर, उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी, दिंडोशीचे आमदार,माजी महापौर सुनील प्रभू, कांदिवली पूर्वचे आमदार अतुल भातखळकर, मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख, पी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पी उत्तर विभागाचे विभाजन करुन पी पूर्व आणि पी पश्चिम असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. या पुनर्रचनेनंतर नवनिर्मित पी पूर्व विभागाचे स्वतंत्र कार्यालय लवकरात लवकर सुरु करण्यात येईल, तसेच त्यामध्ये नागरी सुविधा केंद्र, आवक-जावक विभाग यासह आपत्कालीन नियंत्रण कक्ष, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, पाणीपुरवठा, परिरक्षण या प्रारंभिक सेवांचा समावेश करुन पी पूर्व विभागाचे प्रारंभिक कामकाज सुरु करण्यात येईल, अशी हमी महानगरपालिका प्रशासनाने दिली होती. त्यानुसार, नागरिकांची सोय व्हावी, यादृष्टिने मालाड (पूर्व) मधील रामलीला मैदान परिसरात कुंदनलाल सैगल नाट्यगृहात सध्या सुमारे ९ हजार ६०० चौरस फूट क्षेत्रफळाची तात्पुरती जागा शोधून तेथे पी पूर्व विभाग कार्यान्वित करण्यात आले आहे.

याप्रसंगी खासदार गोपाळ शेट्टी म्हणाले की, मालाड मढ ते कुरार या दोन टोकांदरम्यान पसरलेल्या या विभागात नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांना सहजतेने प्रशासनाच्या सेवा उपलब्ध झाल्या पाहिजेत, यासाठी पी पूर्व विभागाची गरज होती. आता या स्वतंत्र विभागाच्या निर्मितीनंतर ज्या काही गरजा आहेत, त्यांची पूर्तता करावी लागेल. विभागाच्या तात्पुरत्या कार्यालयापासून ते कायमस्वरूपी स्वतंत्र कार्यालयामध्ये स्थलांतरित होईपर्यंत नागरी सेवा-सुविधांना प्राधान्य देण्याची गरज आहे, असे मत खासदार  गोपाळ शेट्टी यांनी मांडले. 

खासदार गजानन कीर्तिकर म्हणाले की, पी पूर्व विभागाच्या माध्यमातून रस्ते रूंदीकरणापासून ते वीज, पाणी यासारख्या अनेक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. पूर्ण क्षमतेने पी पूर्व कार्यालय सुरु झाल्यानंतर नागरिकांना अधिकाधिक व दर्जेदार सुविधा उपलब्ध होतील, असेही त्यांनी नमूद केले. 

आमदार सुनील प्रभू म्हणाले की, पी पूर्व विभागाची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. ती पूर्ण होवून आता सध्या नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली सुविधा अंशतः व तात्पुरत्या जागेतील आहे. महानगरपालिकेकडून विभाग कार्यालयामध्ये देण्यात येणाऱ्या सर्व सेवांचा समावेश असलेले संपूर्ण क्षमतेचे स्वतंत्र असे कार्यालय नवीन जागेत उपलब्ध करून देण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाने जोमाने प्रयत्न करावेत, अशी सूचनाही  आमदार प्रभू यांनी केली.या नव्या कार्यालयाचा जास्त फायदा दिंडोशीतील सहा प्रभागांमधील कुरार,आप्पा पाडा,नागरी निवारा येथील नागरिकांना होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार अतुल भातखळकर म्हणाले की,सदर नवे विभाग कार्यालय सुरू होण्यासाठी मी व आमदार सुनील प्रभू 2014 पासून विधानसभेत व सदनाच्या बाहेर सत्यत्याने प्रयत्न करत होतो.कांदिवली पूर्व विधानसभेत मालाड पूर्वला महापालिकेच्या पी उत्तर-पूर्व विभागाचे तात्पुरते का होईना पण कार्यालायचे लोकार्पण झाले याबद्दल समाधान व्यक्त करत येणाऱ्या २-३ वर्षाच्या आत नव्या जागेवर सुसज्ज कार्यालय उभे केले पाहिजे, अशी मागणी  आमदार भातखळकर यांनी केली.याशिवाय या कार्यालयासाठी लवकरात लवकर पश्चिम द्रुतगती मार्गावरील भूखंडाचे अधीग्रहण करावे, अशी मागणीही त्यांनी केली.

सध्या या कार्यालयामध्ये पाणी, कचरा, जन्म-मृत्यू प्रमाणपत्र अशा सामान्य लोकांशी संबंधित विभाग आज सुरु झाले आहेत. या कार्यालासाठी आवश्यक असलेली पदस्थापना झाली असल्याने येथे आठवडयातुन दोन दिवस सहाय्यक आयुक्तांनी बसावे.तसेच येथील कुंदनलाल सैगल नाट्यगृह मनोरंजनासाठी पुन्हा व लवकरात लवकर महानगरपालिकेच्या वतीने खुले करून द्यावे, अशी मागणी देखील आमदार भातखळकर यांनी केली.

यावेळी सहायक आयुक्त किरण दिघावकर म्हणाले की, पी पूर्व विभागात सध्या आपत्कालीन नियंत्रण कक्ष, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य, पाणीपुरवठा, परिरक्षण या विभागांच्या सेवा नागरिकांसाठी प्रारंभिक टप्प्यात सुरु करण्यात येत आहेत. त्यासोबत नागरी सेवा केंद्र आणि आवक जावक विभागही सुरु असेल. त्यामुळे दिंडोशी कुरार भागातील नागरिकांना जन्म, मृत्यू व विवाह नोंदणी, घनकचरा, आरोग्य, पाणी यासारख्या महत्त्वाच्या विभागांच्या सेवा लगेचच मिळू शकतील. परिणामी नागरिकांना वाहतूक कोंडीतून खर्चिक प्रवास करून पी उत्तर कार्यालयापर्यंत येण्याची गरज राहणार नाही. कुरार आणि मालाड भागातील नागरिकांची यातून सुविधा होणार आहे. लवकरच कायमस्वरूपी व पूर्ण क्षमतेचे कार्यालय उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही सुरू असल्याचेही दिघावकर यांनी नमूद केले.

असा आहे विस्तीर्ण पी उत्तर विभाग

मुंबईत लोकसंख्येच्या दृष्टीने अतिशय घनदाट लोकसंख्या असलेला विभाग म्हणजे पी उत्तर विभाग आहे. मालाड पूर्व आणि मालाड पश्चिम असा एकत्रित ४६.६७ चौरस किलोमीटर क्षेत्राचा हा विभाग आहे. तब्बल १२ लाख लोकसंख्या आणि १८ प्रभागांचा समावेश या विभागात आहे. तर एकूण १४.२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा देखील या विभागाला लाभलेला आहे. त्यामध्ये मढ, सिल्वर, एरंगल, अक्सा आणि मार्वे बीच सारख्या पर्यटन स्थळांचा देखील समावेश आहे. पी उत्तर विभागाची पुनर्रचना व विभाजन करुन पी पूर्व व पी पश्चिम असे दोन स्वतंत्र विभाग करण्यात आले आहेत. त्यानुसार, मालाड पूर्व येथील रामलीला मैदान परिसरात कुंदललाल सैगल नाट्यगृहात सुमारे ९ हजार ६०० चौरस फूट क्षेत्रात पी पूर्व विभागाचे कार्यालय सुरु करण्यात आले आहे. या कार्यालयात नागरी सुविधा केंद्र, आपत्कालीन नियंत्रण कक्ष, घनकचरा व्यवस्थापन, आरोग्य विभाग, पाणीपुरवठा विभाग, परिरक्षण विभाग व आवक-जावक आदी विभागांची सुविधा सुरु करण्यात आली आहे. 

Web Title: Start new P East office with full capacity in next 90 days, Guardian Minister Mangalprabhat Lodha directed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.