मुंबई : राज्यातील विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांचे वेतन १ सप्टेंबर २०१६ पासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. मात्र, राज्यात अनेक ठिकाणी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून शिक्षकांची अडवणूक होत असून, वेतन मिळण्यास विलंब होत असल्याचा आरोप शिक्षक परिषदेने केला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांच्या या वागणुकीच्या निषेधार्थ शिक्षक परिषदेचे राज्याध्यक्ष वेणुनाथ कडू यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिला आहे.शिक्षक परिषदेचे अनिल बोरनारे यांनी सांगितले की, गेल्या १५ वर्षांपासून तीव्र लढा दिल्यानंतर, विनाअनुदानित शाळांना अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, शासनाने २० टक्के अनुदान घोषित केल्यानंतरही प्रशासनाची अडवणूक करत आहे.वेतन अनुदान घोषित करण्याआधी शिक्षण विभागाकडून शाळांचे आॅनलाइन मूल्यांकन झाले होते. त्यात दहा मानके तपासताना नमुना दाखल २० टक्के शाळांची तपासणी झाली, तर काही ठिकाणी त्रयस्थ समितीकडून पुनर्मूल्यांकनही झाले. दरम्यान, शाळा व शिक्षकांची मोठी पिळवणूक झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. (प्रतिनिधी)
विनाअनुदानित शाळांचे वेतन सुरू करा!
By admin | Published: February 10, 2017 5:02 AM