लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाची झालेली पडझड सावरण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विभागनिहाय बैठकांना सुरुवात केली आहे. गुरुवारी त्यांनी मातोश्रीवर जळगाव आणि अहमदनगरमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन निवडणुकीच्या तयारीला लागा, असे आदेश दिले.
उद्धव ठाकरे यांनी राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. अहमदनगरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी असो आपल्याला एकत्र मिळून ही निवडणूक लढायची आहे. त्या उमेदवाराला साथ द्यायची आहे, अशा सूचना ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना दिल्या.
जळगावात स्वतंत्र लढण्याचीही तयारी
जळगाव आणि रावेर लोकसभा मतदारसंघासाठी तयारी करण्याच्या सूचना दिल्या. लोकसभेच्या दोन्ही जागांसह ११ विधानसभा मतदारसंघामध्ये तयारी सुरु करण्याच्या सूचना ठाकरे यांनी दिल्या.