प्राचार्यांप्रमाणे महाविद्यालयातील ग्रंथपालांची पदभरती सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:07 AM2021-05-07T04:07:00+5:302021-05-07T04:07:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यातील अनुदानप्राप्त महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती अनेक वर्षांपासून रखडली आहे. अलीकडेच राज्यभर सरकारने प्राचार्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यातील अनुदानप्राप्त महाविद्यालयातील ग्रंथपाल पदांची भरती अनेक वर्षांपासून रखडली आहे. अलीकडेच राज्यभर सरकारने प्राचार्य भरती प्रक्रिया सुरू केली आहे. याच धर्तीवर ग्रंथपाल पदभरतीवरील निर्बंध उठविण्याची मागणी केली जात आहे. महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासह राज्यातील इतर मंत्र्यांना ईमेलद्वारे निवेदन देऊन ग्रंथपाल पदाची भरती प्रक्रिया तातडीने सुरू करण्याची मागणी केली आहे.
महाविद्यालयात गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा शासनाचा उद्देश पूर्ण करण्यात ग्रंथपाल महत्त्वाची भूमिका बजावत असतात. मात्र महाविद्यालयातील हे महत्त्वाचे पद गेल्या अनेक वर्षांपासून चुकीच्या धोरणामुळे रिक्त राहिले आहे. ३ नोव्हेंबर २०१८ रोजी उच्च व तंत्रशिक्षण विभागाने भरती प्रक्रिया सुरू करण्यासंदर्भात शासन निर्णय काढून त्यात ग्रंथपाल पदांची १०० टक्के पदभरतीस मान्यता देण्यात आली. मात्र त्यानंतर आरक्षण, निवडणूक आचारसंहिता व इतर तांत्रिक अडचणीत भरती प्रक्रिया रेंगाळली. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर पुन्हा भरती प्रक्रिया सुरू झाली. मात्र राज्यात कोरोनाचा शिरकाव झाल्याने भरती प्रक्रियांवर निर्बंध आले. मार्च २०२१ महिन्यात या निर्बंधात शिथिलता आणत महाविद्यालयातील प्राचार्यपदाची भरती प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली. महाविद्यालयातील प्राचार्यपद हे एकाकी पद आहे. दैनंदिन प्रशासकीय व शैक्षणिक कामकाज तसेच नॅक मूल्यांकन करण्याकरिता नियमित प्राचार्य कार्यरत असणे आवश्यक असल्याचा निष्कर्ष त्यासाठी लावण्यात आला. प्राचार्यपदाप्रमाणेच ग्रंथपाल पदसुद्धा एकाकी पद असून तितकेच महत्त्वाचे पद आहे. तरीही ग्रंथपाल पदाच्या भरतीवरील निर्बंध उठविले गेले नाहीत. ही भरती तत्काळ सुरू करण्याची मागणी महासंघाने केली आहे.
मुलाखतीची परवानगी द्यावी
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर शासनाने भरती प्रक्रियेवर निर्बंध लादले. त्यापूर्वी राज्यातील ज्या महाविद्यालयांना शासन नियमानुसार भरतीची परवानगी मिळाली आहे, अशा महाविद्यालयांना तेथील पदाच्या मुलाखतीसाठी तातडीने परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघाच्या वतीने केली जात आहे.
पात्रताधारकांना न्याय द्यावा
ग्रंथपाल पद हे महाविद्यालयातील प्राचार्यांप्रमाणे अत्यंत महत्त्वाचे पद आहे. ते एकाकी असूनही भरतीबाबत सतत दुर्लक्षित राहिले आहे. प्राचार्य पदाच्या भरती प्रक्रियेला मंजुरी मिळते. मग ग्रंथपालांच्या पदासाठी का मिळत नाही? पदभरती प्रक्रिया बंद असल्याने ग्रंथालयशास्त्राचे उच्च शिक्षण घेऊनही पात्रताधारक आज हलाखीचे जीवन जगत आहेत. तरी शासनाने कसलाही वेळ न घालवता प्राचार्यांप्रमाणे ग्रंथपाल पदांची भरती प्रक्रिया सुरू करावी आणि पात्रताधारकांना न्याय द्यावा.
- डॉ. रवींद्र भताने, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य ग्रंथपाल महासंघ.