'नोंदणी सुरु करा, गठ्ठेचे- गठ्ठे घेऊन या'; उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 10:02 PM2022-07-19T22:02:45+5:302022-07-19T22:05:01+5:30
मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई- शिवसेनेच्या आमदारांसोबत आता खासदारही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. मुख्यमंत्री शिंदे दिल्ली दौऱ्यावर असताना या खासदारांनी त्यांची भेट घेतली. पक्षाच्या एकूण १९ खासदारांपैकी १२ खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यामुळे आमदारांपाठोपाठ आता शिवसेनेला खासदारांनीही धक्का दिला आहे.
एकीकडे पक्षातील खासदार, आमदार, नगरसेवक शिंदे गटात सहभागी होत असताना दूसरीकडे शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दररोज शिवसेना भवनात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधत आहेत. आज उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. मैदानात उतरु पुन्हा पक्ष नव्याने बांधू, शिवसेना पुन्हा उभी करु, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले की, जनतेच्या मनात आपल्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती आहे. त्याचा शिवसेना वाढीसाठी उपयोग करा, ही आलेली संधी आहे. तुम्हाला आता एकच काम देतोय, ते म्हणजे नोंदणी. नोंदणीचे गठ्ठेचे- गठ्ठे घेऊन या, असा आदेश उद्धव ठाकरेंनी दिले. तसेच गटप्रमुख आणि शाखाप्रमुखांना घेऊन काम करा, असंही उद्धव ठाकरेंनी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितलं.
माझ्या भात्यातील कितीही बाण घेऊन पळा, पण धनुष्य हे माझ्याकडे आहे, लक्षात ठेवा. शिवसेनेत बंडखोरांनी फूट पाडली नाही तर ती भाजपाने पाडली आहे. भाजपाच शिवसेनेला संपवत आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच सध्या शिवसेनाचा कठीण काळ सुरु आहे. मात्र संघर्षाला ठाकरे घाबरत नाही. हे दिवसही जातील, असा विश्वास उद्धव ठाकरेंनी उपस्थितांना दिला.
दरम्यान, खासदारांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात सर्कस सुरु झालं आहे. गद्दार हा गद्दारच असतो. मूळ शिवसैनिक इथेच आहे. ज्यांनी गद्दारी केली ते निघून गेले, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. तसेच राजीनामा देण्याची हिंमत असेल तर द्या आणि पुन्हा निवडून या, असं आव्हानही आदित्य ठाकरे यांनी यावेळी बंडखोरांना दिलं आहे.