सुमननगर रस्त्याच्या डागडुजीला सुरुवात
By admin | Published: April 13, 2015 02:53 AM2015-04-13T02:53:36+5:302015-04-13T02:53:36+5:30
: सायन-ट्रॉम्बे मार्गावरील चेंबूरच्या सुमननगर येथील मुख्य रस्ता वर्षभरापूर्वीच नव्याने पेव्हर ब्लॉक टाकून तयार करण्यात येत होता.
मुंबई : सायन-ट्रॉम्बे मार्गावरील चेंबूरच्या सुमननगर येथील मुख्य रस्ता वर्षभरापूर्वीच नव्याने पेव्हर ब्लॉक टाकून तयार करण्यात येत होता. मात्र काही दिवसांतच त्याची पूर्णपणे दुर्दशा झाल्याने हा रस्ता पूर्णपणे खचला होता. त्यामुळे या ठिकाणी रोज एकतरी अपघात व्हायचा. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच रस्ते महामंडळाने सध्या हा रस्ता पुन्हा एकदा नव्याने तयार करण्याचे काम हाती घेतले आहे.
नवी मुंबई आणि ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या आणि जाणाऱ्या वाहनांचा सुमननगर जंक्शन हा मुख्य रस्ता आहे. या मार्गावरून २४ तास लहान वाहनांसह अनेक अवजड वाहनांची ये-जा सुरू असते. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या मार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यासाठी राज्य विकास महामंडळाने या ठिकाणी एक उड्डाणपूलदेखील तयार केला. त्यामुळे सायनवरून नवी मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक कोंडी कमी झाली. मात्र ठाणे आणि नवी मुंबईकडून येणारी वाहतूक कोंडीची समस्या अनेक वर्षे तशीच होती. या ठिकाणी असलेल्या रेल्वे पुलामुळे मोठी अडचण होत असल्याने दीड वर्षापूर्वीच या पुलाची रुंदी वाढवून त्याखालील रस्ता अधिक मोठा केला आहे. गेली अनेक वर्षे हे काम या ठिकाणी सुरू होते. त्यानंतर रस्ते विकास महामंडळाने हा रस्ता सिमेंटचा न करता त्या ठिकाणी केवळ पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरता रस्ता तयार केला.
या मार्गावर दिवस-रात्र लाखो वाहनांची ये-जा असताना या ठिकाणी केवळ पेव्हर ब्लॉक टाकल्याने वर्षभरातच हा संपूर्ण रस्ता खचून गेला होता. या मार्गावरील सर्व पेव्हर ब्लॉक वर-खाली झाल्याने वाहतूक कोंडीसोबतच अपघातांची संख्यादेखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढली होती. यामध्ये सर्वाधिक अपघात दुचाकीस्वारांचे झाले आहेत. या जंक्शनलाच लागून चेंबूर वाहतूक विभागाची पोलीस चौकी आहे. त्यांना या रस्त्याची पूर्णपणे कल्पना होती. शिवाय याच मार्गावरून अनेक मंत्र्यांसह सरकारी अधिकाऱ्यांचीदेखील ये-जा असते. मात्र कोणीही याची दखल घेत नव्हते. अखेर परिसरातील मनसेच्या वाहतूक सेनेचे उपाध्यक्ष नितीन नांदगावकर आणि चिटणीस राजेंद्र नगराळे यांनी ही बाब ‘लोकमत’च्या निदर्शनास आणून दिल्यानंतर ‘लोकमत’ने जानेवारी महिन्यात याबाबत वृत्त प्रसिद्ध केले. याचीच दखल घेत गेल्या १० दिवसांपासून या रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)