मुंबई : गेली दोन वर्षे बांधून तयार असलेला रिक्षा डेक सुरू करा, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष व आमदार विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील रणरागिणींनी, शनिवारी निदर्शने करून अंधेरी स्थानक दणाणून टाकले. या निदर्शनांना प्रवाशांनीही उत्स्फूर्त पाठिंबा दिला.पश्चिम रेल्वेने सुमारे तीन कोटी रुपये खर्च करून बांधलेला रिक्षा डेक गेली दोन वर्षे तसाच पडून आहे. हा रिक्षा डेक रेल्वेने विनावापर ठेवल्याबद्दल निदर्शकांनी संताप व्यक्त केला. रिक्षा डेक सुरू करा, प्रवाशांची सोय करा, अशा घोषणा निदर्शक देत होते.त्यानंतर, शिष्टमंडळाने स्टेशन मास्तरांना निवेदनही दिले व लवकरच हे निवेदन पश्चिम रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनाही दिले जाईल, असेही विद्या चव्हाण म्हणाल्या. रिक्षा डेक सुरू झाला, तर ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, आजारी व्यक्ती, अपंग आदींना पुलाच्या पायऱ्या चढण्याचा त्रास घ्यावा लागणार नाही. पश्चिम रेल्वेच्या अधिकाºयांना माणुसकी नाही का, दुर्घटना घडण्याची रेल्वे वाट बघत आहे का, असा प्रश्नही त्यांनी केला.प्रथम या रिक्षा डेकमुळे स्थानकाची सुरक्षा धोक्यात येईल, असे न पटणारे कारण रेल्वे देत होती. आता या मार्गावर स्टॉल आहेत, असे दुसरे खोटे कारण रेल्वेने दिले आहे. रेल्वे प्रशासनाला प्रवाशांच्या सुख-दु:खाशी काहीच देणे-घेणे नाही, हेच यातून दिसते, असे पक्षाच्या मुंबई महिला अध्यक्ष सुरेखा पेडणेकर यांनी या वेळी सांगितले. रिक्षा डेक सुरू झाला, तर येथील रस्त्यावरील गर्दी कमी होईल. अजूनही रेल्वेने हा रिक्षा डेक त्वरेने सुरू केला नाही, तर येथे रिक्षा आणून उभ्या केल्या जातील, असा इशारा पक्षाच्या उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्ष आरती साळवी यांनी दिला.
‘रिक्षा डेक सुरू करा’; राष्ट्रवादीची अंधेरीत निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2018 2:19 AM