Join us

सिद्धार्थनगर ते मागाठाणे रस्ता सुरू करा, नागरिकांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 2:04 AM

बोरीवली पूर्वेकडील मागाठाणे येथील सिद्धार्थनगर परिसरातील महापालिकेचे माता व बालक प्रसूतिगृह रुग्णालय आहे.

मुंबई : बोरीवली पूर्वेकडील मागाठाणे येथील सिद्धार्थनगर परिसरातील महापालिकेचे माता व बालक प्रसूतिगृह रुग्णालय आहे. मागाठाणे विधानसभेतील ७०० ते ८०० रुग्ण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी येतात. परंतु येथे रुग्णांना येण्यासाठी पश्चिम द्रुतगती महामार्गावरून वळसा मारून यावे लागते. त्यामुळे माता व बालकांना हायवेवरील वाहतूक कोंडीमुळे नाहक त्रास सहन करावा लागत आहे. महापालिकेच्या विकास आराखड्यामध्ये जे मंजूर झालेले जोडरस्ते आहेत, ते त्वरित सुरू करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.सिद्धार्थनगरमधून पुढे टाटा पॉवरला जोडणारा रस्ता बंद असल्यामुळे प्रवाशांना पश्चिम द्रुतगती महामार्गावरून ये-जा करावी लागत आहे. रहेजा कुलूपवाडी ते लोखंडवाला कॉम्प्लेक्स (कांदिवली) यामार्गे रस्ता तयार करणे गरजेचे आहे. हा रस्ता नसल्यामुळे सर्व ताण हायवेवर पडतो. ज्या वेळेस शाळा सुटते, तेव्हा हायवेवर प्रचंड वाहतूक कोंडी होते. १९९२च्या विकास आराखड्यामध्ये रस्ता मंजूर आहे. काही लोकांच्या आठमुठेपणामुळे रस्त्याच्या कामात अडथळे येत आहेत. मंगळवारी खासदार गोपाळ शेट्टी यांच्या माध्यमातून या रस्त्यांचा सर्व्हे करण्यात आला. वाहतूक कोंडी फुटावी, यासाठी सिद्धार्थनगर ते टाटा पॉवरपर्यंतचा रस्ता तयार होणे आवश्यक आहे, अशी माहिती रिव्हर मार्चचे सदस्य विक्रम चोगले यांनी दिली.सिद्धार्थनगर इथे महापालिकेने बांधलेले प्रसूतिगृह आहे. या रुग्णालयात बऱ्याच महिला उपचारांसाठी येतात. वाहतूक कोंडीमुळे बºयाच महिलांची रिक्षामध्ये प्रसूती झाली आहे़ परंतु रस्त्याचा विकास काही झाला नाही. याकडे जिल्हाधिकारी आणि महापालिका यांचे अजिबात लक्ष नाही. नवा विकास आराखडा तयार केला जाईल. तेव्हा ज्या काही समस्या येतील त्यांना मुळापासून उखडून टाका. कागदी खेळ खेळू नका, अशी माहिती स्थानिक रहिवासी कृष्णकांत मुळीक यांनी दिली.