मुंबई : देशात-राज्यात कोरोना रुग्णांचा चढता आलेख आणि मुंबईत स्थिती नियंत्रणात येत असली, तरी १ ऑगस्टपासून शाळा सुरू करण्यास ९७ टक्के पालकांनी विरोध दर्शवला आहे. याबाबत पाहणी जरी मुंबईत झाली असली, तरी राज्यातील महानगरांतील पालकांची हीच भूमिका असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. केवळ शहरच नव्हे तर भोवतालचा २० किमीचा परिसर शंभर टक्के कोरोनामुक्त झाल्यानंतर २१ दिवसांनी शाळा सुरू कराव्यात, असे बहुसंख्य पालकांचे मत आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने शाळा सुरू करण्याबाबत घेतलेल्या आढाव्यानंतर महाराष्ट्राबाबत मात्र अद्याप निर्णय घेतला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून शाळाही बंद आहेत. पुनश्च: हरिओम म्हणत लॉकडाऊनचे निर्बंध शिथिल करण्यास राज्य सरकारने सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातील ज्या जिल्ह्यांमध्ये गेल्या महिनाभरात कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नाही तेथे शाळा सुरू करण्याबाबतच्या मार्गदर्शक सूचना सरकारने जारी केल्या आहेत. मुंबईसह विविध महानगरांत शाळा सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. मुंबईतील स्थिती नियंत्रणात येत असली, तरी महामुंबईत रुग्णसंख्या वाढत असल्याने कोरोनाची दहशत कायम असून या संकटकाळात शाळा सुरू करण्यास पालकांचा स्पष्ट विरोध आहे.
देशपातळीवर ऑनलाइन सर्वेक्षण करणाऱ्या लोकल सर्कल या प्रथितयश संस्थेने पालकांची भूमिका जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केले. त्यात शाळांमधील नियमित पद्धतीचे शिक्षण कधी सुरू करावे, या प्रश्नावर पालकांनी आक्रमक प्रतिक्रिया नोंदविल्या आहेत. त्यात हा विरोध ठळकपणे पुढे आला. शहरांतील १० हजार ५०० पालकांनी मत नोंदविले असून त्यात ६१ टक्के पुरुष आणि ३९ टक्के महिलांचा समावेश आहे.
ऑनलाइन शिक्षण सुरळीत
ऑनलाइन पद्धतीने शिक्षण सुरू झाले आहे का, या प्रश्नावर ७० टक्के पालकांनी हो, हे शिक्षण सुरळीत पद्धतीने सुरू असल्याचे उत्तर दिले आहे. तर, २३ टक्के पालकांनी शिक्षण सुरू झाले आहे, मात्र त्यात अडथळे येत असल्याचे सांगितले. ७ टक्के पालक अद्याप या शिक्षणाच्या प्रतीक्षेत आहेत.
विद्यार्थ्यांना लागण होण्याची भीती
शाळा सुरू झाल्या तर विद्यार्थीच नव्हे तर त्यांच्या कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण होण्याची भीती आहे. अनेकांच्या घरात आजी-आजोबा आहेत. त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. कोरोना संकटामुळे बहुसंख्य कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे. त्यामुळे पैसा जपून खर्च केला जात आहे.
सध्याच्या परिस्थितीत शाळेच्या सर्व सेवासुविधांचा वापर होत नसताना पूर्ण फी का भरावी, असाही अनेकांचा प्रश्न आहे. लोकल सर्कलतर्फे या सर्वेक्षणाचा अहवाल राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. महानगरांतील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यासाठी तो उपयुक्त ठरेल, असे या संस्थेच्या प्रतिनिधींचे म्हणणे आहे.