हिमोफेलियासाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करा
By admin | Published: April 18, 2017 05:56 AM2017-04-18T05:56:31+5:302017-04-18T05:56:31+5:30
सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी असल्याने हिमोफेलियाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करा, अशी सूचना सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली
मुंबई : सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची गर्दी असल्याने हिमोफेलियाच्या रुग्णांसाठी स्वतंत्र रुग्णालय सुरू करा, अशी सूचना सोमवारी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला केली. हिमोफेलिया औषधांचा तुटवडा असल्याने उपचाराची अत्यावश्यकता असलेल्या रुग्णांपर्यंत योग्यवेळी औषधे पोहचवण्यासाठी काही यंत्रणा अस्तित्वात आहे का? अशी विचारणा यावेळी न्यायालयाने केली.
हिमोफेलियावरील औषधांचे उत्पादन भारतात होत नसल्याने या औषधांचा साठा करून रुग्णांपर्यंत औषधे पोहचवण्याचे निर्देश द्यावेत, अशी जनहित याचिका एका हिमोफेलिया रुग्णाने केली आहे.
सुनावणीत मुंबईव्यतिरिक्त पुणे, अहमदनगर येथेही या औषधांचा तुटवडा असल्याचे याचिकाकर्त्यांचे वकील मीनाज ककालिया यांनी सांगितले. त्यावर मुंबई पालिकेच्या वकिलांनी औषधांचा काही साठा वर्ल्ड हेमोफेलिया फाऊंडेशनकडून तर काही राज्य सरकारकडून मिळत असल्याचे सांगितले. वर्ल्ड हेमोफेलिया फाऊंडेशनकडून मिळणाऱ्या औषधांची नोंद आॅनलाईन होते, अशी माहिती मीनाज यांनी खंडपीठाला दिली. त्यावर खंडपीठाने राज्य सरकारनेही साठ्याची आॅनलाईन माहिती उपलब्ध करावी, अशी सूचना सरकारला केली. (प्रतिनिधी)