दिव्यांगाकरिता स्वतंत्र विभाग सुरू करा - सुप्रिया सुळे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2019 01:24 AM2019-12-02T01:24:11+5:302019-12-02T01:24:21+5:30
लाखो युवकांना महापोर्टल मदत ठरण्याऐवजी अडचण ठरत आहे.
मुंबई : दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारीत वेगळा विभाग निर्माण करावा आणि महापोर्टल सेवा बंद करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली.
दिव्यांगाच्या विविध मागण्यांसाठी व महापोर्टल सेवा बंद करण्याबाबत सुळे यांनी त्यांची भेट घेतली. दिव्यांगाच्या २०१६ सालच्या कायद्यामुळे २१ प्रकारच्या दिव्यांग प्रकारांना सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे दिव्यांगांबाबतच्या कामाची व्याप्ती वाढली आहे. इतर काही राज्यांमध्ये दिव्यांगांसाठी सचिव ते जिल्हास्तरावर वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे, याची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांना दिली.
लाखो युवकांना महापोर्टल मदत ठरण्याऐवजी अडचण ठरत आहे. त्यामुळे युवकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते बंद करून पुर्वीप्रमाणेच परीक्षा पद्धत ठेवावी, अशी मागणी करणारे निवेदनही सुळे यांनी दिले.