पेटणाऱ्या चितेतून निघणारा धूर आमचा जीव घेणार का? विद्युत वाहिन्या सुरू करा!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 09:56 AM2023-12-06T09:56:22+5:302023-12-06T09:56:58+5:30
अद्यापही सुविधांची वानवा, विद्युत दाहिन्या केव्हा कार्यरत होणार ?
मुंबई : सद्य:स्थितीत मुंबईतीलप्रदूषणाची वाढती समस्या लक्षात घेऊन विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांमध्ये स्मशानभूमीतील धुरामुळे ही प्रदूषण होत असून यावर उपाययोजना कराव्या लागतील, असे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी सुचविले आहे. त्यामुळे मुंबईतील स्मशानभूमीची दर्जोन्नती लवकरच पालिकेकडून हाती घेण्यात येणार आहे. पर्यावरणाचे हित लक्षात घेता अनेक ठिकाणी विद्युत दहन वाहिनीची व्यवस्था करण्यात आलेली आहे; परंतु बहुतांश ठिकाणी त्या बंद असल्याने स्थानिकांची गैरसोय कायम असल्याचे पाहायला मिळाले आहे. अनेक ठिकाणी या स्मशानभूमीपर्यंत पोहोचण्यासाठी स्थानिक नागरिकांची अक्षरश: दमछाक होत असल्याचे दिसून आले आहे. स्मशानभूमीतून बाहेर पडणारा हा धूर मानवी आरोग्यासाठी घातक आहे आणि त्याचा नकारात्मक परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर दिसून येतो आहे. अनेक ठिकाणी येथील विषारी धूर आणि घातक राख पसरत असल्याची तक्रार करण्यात येते.
सुविधांची माहिती नाही-
मुंबईत एकूण २०१ ठिकाणी अंतिम संस्कार करण्यात येणारी स्मशानभूमी, दफनभूमी आहे.
या सर्व ठिकाणी स्वच्छता, पिण्याचे पाणी, बसावयाच्या जागा, स्वच्छतागृहे यासारख्या प्राथमिक सोयी-सुविधांबरोबरच प्रवेशद्वार, दिशादर्शक फलक, माहिती फलक यासह परिसराची देखभाल करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आहेत.
शिवाय सर्व सहायक आयुक्तांनी आपापल्या विभागात ही कामे व्यवस्थितपणे होतील यासाठी विशेष काळजी घेण्याचे आदेश दिले होते; परंतु अद्यापही अंतिम संस्काराच्या ठिकाणी गैरसोयीच पाहायला मिळत आहे.
काही महिन्यांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्या. गिरीश कुळकर्णी यांच्यासमोर याप्रकरणी सुनावणीही झाली होती. स्मशानभूमीमध्ये धूर प्रतिबंधक यंत्रणांसह आवश्यक त्या सुविधा ही असणे आवश्यक आहे. शिवाय प्रदूषणाविरोधी नियमांचे पालनही होणारे आवश्यक आहे.
सद्य:स्थितीत १० स्मशानभूमीमध्ये विद्युत दाहिनी व १३ स्मशानभूमीमध्ये गॅसदाहिनी बसविली आहेत.
इतर ठिकाणी ही कामे केव्हा होणार यासाठी निश्चित वेळ पालिकेकडून देण्यात आलेली नाही