Join us

बेकायदा टॉवरवर वीज वाहिन्या टाकण्यास सुरुवात

By admin | Published: November 05, 2014 10:03 PM

विद्युत पारेषण कंपनीचे कानसई सब स्टेशन ते डोलवी (वडखळ) दरम्यान विद्युत टॉवरवर उच्च दाबाच्या वीजवाहिन्या टाकण्याचे काम सध्या चालू आहे

राजू भिसे, नागोठणेविद्युत पारेषण कंपनीचे कानसई सब स्टेशन ते डोलवी (वडखळ) दरम्यान विद्युत टॉवरवर उच्च दाबाच्या वीजवाहिन्या टाकण्याचे काम सध्या चालू आहे. मात्र, हे टॉवर अनधिकृतरीत्या आमच्या शेतात बांधले असल्याचा शेतकऱ्यांचा दावा आहे. हे काम त्वरित थांबविले नाही, तर आंदोलनाचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे. डोलवी येथील जे . एस. डब्लू. कंपनीकरिता ही वाहिनी टाकली जात असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत कंपनीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही. कानसई - नागोठणे - डोलवी दरम्यान उच्च दाबाच्या विद्युत तारा खेचण्याचे काम सध्या चालू आहे. सात ते आठ वर्षांपूर्वी या मार्गात टॉवरचे बांधकाम चालू करण्यात आले होते. त्यावेळी ही वाहिनी एन्रॉन कंपनीची असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आले. तेव्हा हे काम सरकारी आहे असे शेतकऱ्यांना वाटल्याने गावाच्या, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी कोणत्याही प्रकारचे आढेवेढे न घेता टॉवरचा पाया बांधायला परवानगी दिली होती. टॉवर बांधताना शेतकऱ्यांनी आर्थिक नुकसानभरपाई तसेच कंपनीत नोकरीची मागणी सुद्धा केली होती. काही वर्षांनंतर या पायांवर टॉवर उभारून त्यावरून तारा खेचण्याचे काम कोणत्याही प्रकारची परवानगी न करता करण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. संबंधित कामाबाबत ठेकेदाराच्या कर्मचाऱ्याकडे हरकत घेतली असता, हे काम सरकारी असून काही अडथळा आणण्याचा प्रयत्न केलात तर कठोर कारवाई होईल, अशी धमकी देण्यात येत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. सरकार, शेतीचे उत्पादन वाढविण्याचे शेतकऱ्यांना आवाहन करते आणि दुसरीकडे पिकत्या शेतजमिनींमध्ये असे टॉवर बांधायला सांगते हे शासनाचे दुटप्पी धोरण नक्की शेतकऱ्यांच्या फायद्याचे की उद्योगपतींच्या, असा प्रश्न स्थानिक शेतकऱ्यांकडून विचारण्यात येत आहे.