कर्जतमध्ये वृक्षतोड सुरूच
By admin | Published: April 5, 2015 10:13 PM2015-04-05T22:13:45+5:302015-04-05T22:13:45+5:30
तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील आसे गावाच्या परिसरातील झाडे तोडण्याचे काम सुरू आहे, मात्र झाडे तोडणाऱ्या ठेकेदारांकडून
कर्जत : तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीतील आसे गावाच्या परिसरातील झाडे तोडण्याचे काम सुरू आहे, मात्र झाडे तोडणाऱ्या ठेकेदारांकडून तेथील परवानगी न दिलेली झाडे देखील तोडली जात आहेत. त्याबद्दल वन विभागाला त्याची माहिती दिली असता वन विभागाने परवानगी न दिलेली झाडे तोडल्याबद्दल ठेकेदार आणि शेतकऱ्यांना धारेवर धरले आहे. दरम्यान, वन विभागाने अद्याप कोणतीही कारवाई केली नसून जंगलतोड ठेकेदाराला मोकाट सोडण्याचा प्रयत्न होताना दिसत आहे.
कर्जत येथील वन विभागाकडून आसे गावातील शेतकऱ्यांनी वाढवलेली इंजायली झाडे तोडण्याची रीतसर परवानगी दिली आहे, पण संबंधित ठेकेदाराने त्या जमिनीवर झालेली मोठी झाडे तोडताना जी परवानगी दिली नाही अशीही झाडे तोडत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे जी झाडे मौल्यवान आहेत त्यांची देखील सरसकट तोड या ठेकेदाराकडून सुरु आहेत. त्यापुढे जावून संबंधित ठेकेदाराने तेथील पिंपळ वृक्षाचे झाड तोडण्यापर्यंत मजल मारली आहे. त्याबाबत कर्जत वन विभागाच्या कळंब येथील कार्यालयाशी संपर्क साधला असता तेथील अधिकाऱ्यांनी इंजायली झाडे तोडण्याची परवानगी दिली असल्याची माहिती दिली, परंतु अन्य मौल्यवान झाडे तोडली जात असल्याची माहिती आहे काय ? याची चौकशी केली असता त्यांनी पाहून माहिती देतो असे उत्तर दिले.
वन विभागाने परवानगीशिवाय तोडलेल्या झाडांची मोजदाद केली नसल्याची माहिती दिली. त्यांनी परवानगी नसलेली झाडे तोडली असल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. दुसरीकडे अशी झाडे तोडल्याची कोणतीही नोंद कर्जत वन विभागाकडे नाही. (वार्ताहर)