‘केईएम’मध्ये लसीकरणाला प्रारंभलोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोनाच्या तीव्र संक्रमणकाळात रुग्णालयातील भयाण शांतता, चिंतेत असलेले चेहरे आणि रुग्णाच्या काळजीने अहोरात्र ताटकळत बसलेले कुटुंब या स्थितीनंतर शनिवारी परळ येथील केईएम रुग्णालयाच्या आवारातील वातावरणात अत्यंत सकारात्मकता दिसून आले. केईएम रुग्णालयात शनिवारी सकाळी लसीकरण केंद्राबाहेर रांगोळी काढण्यात आली होती. धाकधूक, भीती अन् आनंद असे संमिश्र वातावरण हाेते.
केईएम रुग्णालयात शनिवारी सकाळी रुग्णालयाचे उपअधिष्ठाता डॉ. मिलिंद नाडकर यांना सर्वांत आधी लसीकरणाचा मान मिळाला. त्यानंतर आरोग्य कर्मचारी विमल खरात आणि डॉ. शेखर जाधव यांनी लसीचा डोस घेतला. लसीकरण केंद्रात मुख्य कक्षात नोंदणी पडताळल्यानंतर स्वाक्षरी करून लस देण्यात येत आहे. लसीकरण केंद्रात फिजिकल डिस्टन्सिंग पाळण्यात आले
या केंद्रात लसीकरण अधिकारी म्हणून काम करणाऱ्या वरिष्ठ परिचारिका चारूशीला मोरे यांनी सांगितले. तीव्र संसर्गाच्या काळात कोरोना कक्षात काम केल्यानंतर शनिवारी लसीकरण केंद्रात काम करण्याचा हाेणारा आनंद वेगळा आहे. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य मिळाल्यामुळे वेगळी भावना आहे. मीही नोंदणी केली आहे. मात्र माझा नंबर येण्यास काही दिवस जावे लागतील. या कक्षात समन्वय पाहण्याची जबाबदारी आहे. लसीकरणानंतर अर्ध्या तासासाठी लस दिलेल्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे.
* अत्यानंद आणि अभिमान
आज खूप समाधानाची भावना आहे. इतक्या खडतर काळात काम केल्यानंतर लसीकरणासाठी आम्हांला प्राधान्य देण्यात आले आहे. त्यातही पहिल्याच दिवशी डोस मिळाल्याने आनंद आहे. शिवाय ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळात सर्व कोविड योद्ध्यांनी संघर्ष केला आणि त्यांनाच लसीकऱणाचा मान मिळाला याचाही अभिमान आहे.
- डॉ. मीनल शहा, केईएम रुग्णालय
निर्धास्तपणे लस घ्या !
लसीकरणाच्या प्रक्रियेत समाजासाठी डॉक्टर-आरोग्य कर्मचारी आदर्श आहेत. या भावनेने आज समाजातील सर्व घटकांना आम्ही संदेश देत आहाेत की, आम्ही लस घेतली, तुम्हीही निर्धास्तपणे घ्या. अफवेला बळी पडू नका. लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत किंवा अजून याबाबत एकही तक्रार आलेली नाही. लसीच्या डोसनंतर अगदी क्वचित प्रमाणात एखाद्याला अंगदुखी वगैरे वाटू शकते. मात्र, त्यात घाबरण्यासारखे काही नाही. ही अत्यंत सामान्य स्थिती आहे. यंत्रणेवर विश्वास ठेवा. लसीचा डोस निश्चित घ्या
- डॉ. मिलिंद नाडकर, उपअधिष्ठाता, केईएम रुग्णालय
* भीती पळून गेली
मुंबई पालिकेच्या मुख्यालयात लसीकरण विभागात २००१ पासून काम करीत आहे. लसीकरण केंद्रात आलो त्यावेळी मनात भीती होती. लसीचा डोस घेतल्यानंतर ही भीती पळून गेली. कोरोनाच्या १० महिन्यांच्या काळात अहोरात्र केलेली मेहनत आता क्षणभरात डोळ्यांसमोरून गेली. लस घेतल्यामुळे खूप बरे वाटत आहे.
- प्रवीण मकवाना,
आरोग्य कर्मचारी, महापालिका लसीकरण विभाग
...................................