Join us

शिवग्रामीण योजनेचा आरंभ

By admin | Published: January 06, 2017 4:26 AM

हवेतील प्रदुषणाचे नियंत्रण करणारी ‘वायू’ या देशातील पहिल्या हवा शुध्दीकरण यंत्रणेसह शिवग्रामीण टॅक्सी योजनेचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे येथील कलानगर जंक्शन येथे

मुंबइ : हवेतील प्रदुषणाचे नियंत्रण करणारी ‘वायू’ या देशातील पहिल्या हवा शुध्दीकरण यंत्रणेसह शिवग्रामीण टॅक्सी योजनेचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते वांद्रे येथील कलानगर जंक्शन येथे शुभारंभ करण्यात आला. यावेळी पर्यावरण मंत्री रामदास कदम, परिवहन मंत्री दिवाकर रावते आदी मान्यवर उपस्थित होते. उद्धव ठाकरे यांनी हवा शुध्दीकरण यंत्रणा आणि शिव ग्रामीण टॅक्सी योजनेचे कौतुक करुन नागरिकांना श्वास आणि घास चांगला घेता येईल, असे सांगितले. ग्रामीण भागातील वाढत्या बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर शिवग्रामीण टॅक्सी योजना ही अत्यंत महत्वाची योजना आहे. याशिवाय खास महिलांसाठी सुरु होत असलेली अबोली रंगाची रिक्षांमुळे महिला प्रवाशांना सुरक्षिततेची हमी मिळणार आहे. महिला रिक्षा चालकांनाही हक्काचा रोजगारही उपलब्ध होणार आहे. शिवग्रामीण टॅक्सी योजने अंतर्गत बाद झालेल्या ‘तीन चाकी - सहा आसनी’ आॅटो रिक्षांच्या परवानाधारकांना आता ७०० सीसी इंजिन क्षमता असलेली ‘चार चाकी - सहा आसनी’ टॅक्सी वापरास परवानगी देण्यात आली. तर, बाद झालेल्या ‘तीन चाकी - तीन आसनी’ रिक्षांच्या परवानाधारकांना ६०० सीसी इंजिन क्षमता असलेली ‘चार चाकी - चार आसनी’ टॅक्सी वापरास परवानगी देण्यात आली. शिवग्रामीण टॅक्सी योजनेतील वाहनांचा रंग नारंगी-पांढरा असा असणार आहे. तर, हवा शुद्धिकरण यंत्रणेमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी करता येणार आहे. सध्या मुंबईत सायन, वांद्रे, घाटकोपर, भांडूप आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज स्थानक येथे ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. हवा शुध्दीकरण यंत्रणा २०० फुटापर्यंतचे प्रदुषण खेचून घेते आणि शुध्द हवा बाहेर फेकते. यावेळी युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, महापौर स्नेहल अंबेकर, आमदार अनिल परब, तृप्ती सावंत यांच्यासह परिवहन आणि पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)