ज्येष्ठ, व्याधीग्रस्तांना दुसरा लसीचा डोस घेण्याकरिता वॉक इन पद्धत सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:06 AM2021-05-12T04:06:14+5:302021-05-12T04:06:14+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क मुंबई : ६० वर्षांवरील ज्येष्ठ व व्याधीग्रस्त नागरिकांना दुसरा लसीचा डोस घेण्याकरिता वॉक इन पद्धत सुरू ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ६० वर्षांवरील ज्येष्ठ व व्याधीग्रस्त नागरिकांना दुसरा लसीचा डोस घेण्याकरिता वॉक इन पद्धत सुरू करा, अशी आग्रही मागणी प्रभाग क्रमांक ८४ चे भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी मंगळवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एका पत्राद्वारे केली.
पालिका आयुक्तांच्या ६ मे च्या आदेशानुसार ७ मेपासून फक्त ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेल्या नागरिकांना पहिला व दुसरा डोस दिला जाणार आहे. मात्र, पालिकेच्या लसीकरण प्रणालीत सावळा गोंधळ असून कोविन ॲपवर नोंदणीत बरेच अडथळे येतात. त्यामुळे नागरिकांना नोंदणी करता येत नाही, ही वस्तुस्थिती आहे.
विलेपार्ले पूर्व येथील शिरोडकर हॉस्पिटल येथे सकाळी साडेअकरा वाजता ऑनलाइन रजिस्ट्रेशन केलेले १६ पैकी फक्त ६ नागरिक उपस्थित हाेते. त्यामुळे डोसची बाटली उघडता येत नाही. इतरांची म्हणजे ज्यांची ऑनलाइन नोंदणी झालेली नाही त्यांना दुसऱ्या डोससाठी वॉक इन प्रवेश मिळत नाही, असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
अनेक ६० वर्षांवरील नागरिक व इतर व्याधीग्रस्त नागरिकांना आपले नेहमीचे औषधाेपचार लसीचा डोस घेण्याआधी २ दिवस थांबवावे लागत आहेत. त्यामुळे लसीकरणही नाही आणि नेहमीचे उपचारही बंद अशी गंभीर परिस्थिती उद्भवली आहे.
त्यामुळे ६० वर्षांवरील ज्येष्ठ व व्याधीग्रस्त नागरिकांना दुसरा लसीचा डोस घेण्याकरिता वॉक इन पद्धत सुरू करा, अशी आग्रही मागणी प्रभाग क्रमांक ८४ चे भाजप नगरसेवक अभिजित सामंत यांनी मंगळवारी पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना एका पत्राद्वारे केली. नोंदणीअभावी जर ६० दिवसांत दुसरा डोस मिळाला नाही तर पहिला डोस फुकट जाणार, या चिंतेत ज्येष्ठ व व्याधीग्रस्त नागरिक आहेत, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
...............................................