बेकायदा पार्किंग पडणार महागात, १० हजारांच्या दंडवसुलीला सुरुवात!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:25 AM2019-07-08T06:25:11+5:302019-07-08T06:27:42+5:30
महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या अनधिकृत पार्किंगविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले होते.
मुंबई : मुंबई महापालिकेतर्फे सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५00 मीटर परिसरात अवैध पार्किंग करणाऱ्या वाहनांविरुद्ध आजपासून धडक दंडात्मक कारवाई सुरू करण्यात आली. जी दक्षिण विभागात पहिला दंड ठोठावत पहिल्या दिवशी एकूण ५६ वाहनांविरुद्ध कारवाई करण्यात आली. यापैकी ९ वाहनमालकांनी प्रत्येकी दहा हजार रुपये दंड भरून वाहने सोडवून घेतली. उर्वरित ४७ वाहने महापालिकेच्या ताब्यात असून ती परत देताना दंडासह विलंब शुल्क आकारले जाणार आहे.
महापालिकेच्या २३ सार्वजनिक वाहनतळांलगतच्या अनधिकृत पार्किंगविरुद्ध कारवाई करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांनी दिले होते. या कारवाईअंतर्गत संबंधित परिसरात एखादे अवजड वाहन अनधिकृतपणे उभे असल्याचे आढळल्यास त्यावर किमान १५ हजार रुपये दंड आकारणी करण्यात येणार आहे. मध्यम आकाराच्या वाहनांवर रुपये ११ हजार; तर कार-जीप यासारखी वाहने अनधिकृतपणे पार्क केल्याचे आढळल्यास त्यावर १० हजार रुपये एवढी दंड आकारणी करण्यात येणार आहे.
रिक्षा, साइडकार असलेले दुचाकी वाहन इत्यादी तीन चाकींवर रुपये ८ हजार, तर अनधिकृतपणे पार्क केलेल्या दुचाकी वाहनांवर किमान ५ हजार रुपये एवढी दंड आकारणी करण्यात येणार आहे. सध्या २३ ठिकाणी सार्वजनिक विक्री करण्यात येणार आहे.
वाहनतळ गैरसोयीचे
कित्येक भागात वाहनतळ सार्वजनिक ठिकाणांपासून लांब असल्याने अनेक वाहनचालकांची गैरसोय होते, असे मत एका वरिष्ठ वाहतूक पोलीस अधिकाºयाने व्यक्त केले.
दंड टाळायचा असेल तर...
सार्वजनिक वाहनतळावर वाहन उभे करा
कित्येक ठिकाणी खासगी वाहनतळ उपलब्ध आहेत त्याचा वापर करा
ठिकाणापर्यंत गाडी नेण्याचा मोह टाळा, काही अंतर चालत जा
परिमंडळ- एक ८ चारचाकी वाहने
परिमंडळ - दोन ३ चारचाकी वाहने
दंड वसूल २0 हजार
परिमंडळ- तीन
१२ चारचाकी
५ दुचाकी
दंड ४0 हजार
परिमंडळ- चार
१२ चारचाकी
दंड १0 हजार
परिमंडळ- सहा
६ चारचाकी
१ तीन चाकी
३ दुचाकी
दंड १0 हजार
परिमंडळ- सात
४ चारचाकी
२ तीन चाकी
दंड १0 हजार
वाहतूक पोलिसांचा दंड २०० तर पालिकेचा १०,०००
नो पार्किंग झोनमध्ये वाहने उभी केल्यास वाहतूक पोलीस २०० रुपये दंड आकारतात तर पालिका १०,००० दंड आकारत आहे. टोइंग केलेल्या चारचाकी वाहनासाठी ६७२ रुपये तर दुचाकीला ४३६ रुपये दंड आकारला जातो. पालिकेकडून अवजड वाहनासाठी किमान १५ हजार तर कमाल २३,२५० रुपये, मध्यम वाहने किमान ११ हजार तर कमाल १७,६००, लहान चारचाकी वाहने किमान १० हजार, कमाल १५,१००, तीनचाकी वाहने ८ हजार,
कमाल १२,२००, दुचाकी किमान ५ हजार तर कमाल ८,२०० दंड आकारला जातो.
वाहनतळांबाबत
नागरिक अनभिज्ञ
बºयाच ठिकाणी वाहनतळ असल्याची माहिती त्या परिसरातील नागरिकांना नसल्याने अनेक जण रस्त्याच्या कडेला वाहने पार्क करतात. त्यामुळे महापालिकेने त्याबद्दल जनजागृती करायला हवी, अशी मागणी करण्यात येत आहे.
दंडाची रक्कम वापरणार विकासकामांसाठी
सार्वजनिक वाहनतळांलगतच्या ५०० मीटर परिसरात आढळणाºया अनधिकृत पार्किंगविरोधातील कारवाईत दंडापोटी जमा होणारी रक्कम त्या त्या विभागातील विकासकामांवर खर्च केली जाईल, अशी माहिती पालिकेने दिली आहे.