मुंबई ते मांडवा रो-रो सेवेला प्रारंभ, हॉवरक्राफ्ट जूनपर्यंत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2020 07:02 AM2020-03-16T07:02:31+5:302020-03-16T07:03:23+5:30

मुंबई ते नवी मुंबई, कल्याण, वसई ही ठिकाणे अंतर्गत जलमार्गाने जोडण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, लवकरच काही मार्गांवर हॉवरक्राफ्ट सेवा सुरू करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय नौकावहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला.

Starting from Mumbai to Mandawa Roe-Ro service | मुंबई ते मांडवा रो-रो सेवेला प्रारंभ, हॉवरक्राफ्ट जूनपर्यंत

मुंबई ते मांडवा रो-रो सेवेला प्रारंभ, हॉवरक्राफ्ट जूनपर्यंत

Next

मुंबई : मुंबई ते मांडवा दरम्यान रो रो सेवा रविवारी सुरू करण्यात आल्याने, रस्तेमार्गाने मुंबई ते मांडवा जाण्यासाठी सध्या लागणारा तीन साडेतीन तासांचा कालावधी पाऊण ते एक तास झाला आहे. मुंबई ते नवी मुंबई, कल्याण, वसई ही ठिकाणे अंतर्गत जलमार्गाने जोडण्याबाबत सरकार प्रयत्नशील असून, लवकरच काही मार्गांवर हॉवरक्राफ्ट सेवा सुरू करण्यात येईल, असा विश्वास केंद्रीय नौकावहन राज्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला. मुंबई परिसरातील १२ ठिकाणे निश्चित केली असून, त्यांना जलमार्गाशी जोडण्याचा आमचा प्रयत्न आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सार्वजनिक कार्यक्रम टाळण्याचे राज्य सरकारचे धोरण असल्याने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे टाळले. मात्र, या सेवेला त्यांनी शुभेच्छा दिल्या.
मांडवीय यांनी भाऊचा धक्का येथे या जहाजाची पाहणी केली. मुंबई पोर्ट ट्रस्टचे अध्यक्ष संजय भाटिया यावेळी त्यांच्यासोबत होते. महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. एन.रामास्वामी यांनीही मांडवा येथे या जहाजाची पाहणी करून शुभेच्छा दिल्या.
मांडवीय म्हणाले, मुंबई ते नवी मुंबई, ठाणे, कान्होजी आंग्रे बेट हॉवरक्राफ्टने जोडण्याबाबत विचार सुरू असून, लवकरच याबाबत कार्यवाही केली जाईल. काही खासगी कंपन्यांनी यामध्ये रस दाखविला आहे. नौकावहन मंत्रालयाचे शिष्टमंडळ याबाबतचा अभ्यास करण्यासाठी रशियाला जाऊन आले. मात्र, कोरोनामुळे सध्या पुढील कार्यवाही थांबली आहे. या ठिकाणी पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी आवश्यक कामे पूर्ण झाली आहेत. जलवाहतूक अधिक व्यापक करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूककोंडीत मोठा फरक पडेल, असा विश्वास मांडवीय यांनी व्यक्त केला.
या सेवेमुळे पर्यटन व्यवसायाला लाभ होईल, प्रदूषण कमी होईल, वाहतूककोंडीतून सुटका होईल, असेही मांडवीय म्हणाले.

प्रवासी क्षमता
ग्रीसमधून आणण्यात आलेल्या या जहाजाची बांधणी सप्टेंबर, २०१९ मध्ये करण्यात आली असून, ५०० प्रवासी व १४५ वाहनांची ने-आण करण्याची क्षमता आहे. कंपनीने महाराष्ट्र मेरिटाइम बोर्ड अणि मुंबई पोर्ट ट्रस्टबरोबर संयुक्त करार केला असून, त्या माध्यमातून मुंबईचा जलमार्ग वाहतुकीसाठी वापरला जाणार आहे. त्या बदल्यात कंपनी ठरावीक रक्कम देईल.
दर तीन तासांनी या जहाजाची फेरी होईल. गेटवे आॅफ इंडिया व मांडवा दरम्यान प्रवास करणाऱ्या वार्षिक १५ ते २० लाख प्रवाशांना यामुळे दिलासा मिळेल.

दरपत्रक

मुंबई ते मांडवा दरम्यान रो-रो सेवा सुरू झाली असली, तरी त्याचे दर काहीसे चढे असल्याने सर्वसामान्य नागरिक या सेवेला कसा प्रतिसाद देतील, त्यावर पुढील प्रकल्पांचे भविष्य अवलंबून राहील. छोटे चारचाकी वाहन- ८८० रुपये, मध्यम चारचाकी वाहन - १,३२० रुपये, मोठी चारचाकी वाहने - १,७६० रुपये, दुचाकी - २२० रुपये, सायकल - ११० रुपये, मिनिबस-३,३००, मोठी बस - ५,५०० रुपये, प्रवासी - २२५, एसी आसन - ३३५, व्हीआयपी विभाग - ५५५ रुपये खाद्यपदार्थ विक्रीसाठी स्वतंत्र दर आकारण्यात येईल.

जलवाहतूक सेवेतील मैलाचा दगड
शासनाने मांडावा जेट्टी येथे यासाठी सर्व सोयी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. किनारपट्टीच्या भागात सर्वत्र अशी जलवाहतूक सुरू करता येईल का, ते आम्ही पाहत आहोत. नवी मुंबईतील नेरूळ, बेलापूर येथूनही लवकरच जलवाहतूक सुरू करण्याची तयारी आहे. भार्इंदर ते डोंबिवली अशा जलवाहतुकीच्या आराखड्यास अंतिम मंजुरी मिळून २ वर्षांत तीही सेवा सुरू होईल. एकूणच जलवाहतुकीच्या माध्यमातून पर्यटन व रोजगार वाढविला जाईल. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

Web Title: Starting from Mumbai to Mandawa Roe-Ro service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई