Join us

नामनिर्देशनपत्रे भरण्याची सुरुवात २९ मार्चपासून

By admin | Published: March 27, 2016 1:23 AM

जिल्ह्यातील मे ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या १२४ ग्रामपंचायतींसाठी (ग्रा.पं.) १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना २९ मार्च

ठाणे : जिल्ह्यातील मे ते आॅगस्टदरम्यान मुदत संपणाऱ्या १२४ ग्रामपंचायतींसाठी (ग्रा.पं.) १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना २९ मार्च ते २ एप्रिल या कालावधीत नामनिर्देशनपत्रे दाखल करता येईल, अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने केली आहे.निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताच या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात १२ मार्चच्या मध्यरात्रीपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूक कार्यक्रमानुसार शहापूर तालुक्यात सर्वाधिक ६७ ग्रा.पं. असून मुरबाडमधील २९, भिवंडीमधील २७ आणि अंबरनाथ तालुक्यातील एका ग्रा.पं.चा समावेश आहे. त्यासाठी इच्छुक उमेवारांना मंगळवारपासून ठिकठिकाणच्या तहसीलदार कार्यालयात नामनिर्देशनपत्रे भरता येणार आहेत. प्राप्त उमेदवारी अर्जांची छाननी ४ एप्रिल रोजी करण्यात येणार आहे, तर ६ एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. याच दिवशी उमेदवारांना निवडणूक चिन्हे दिली जाणार असून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी घोषित केली जाणार आहे.अवघ्या ११ दिवसांच्या प्रचारानंतर निवडणूक रिंगणातील उमेदवारांना १७ एप्रिल रोजी मतदानास सामोरे जावे लागणार आहे. मतदानानंतर दुसऱ्याच दिवशी १८ एप्रिल रोजी तहसीलदारांद्वारे ठिकठिकाणी मतमोजणी करण्याचे नियोजन केले आहे. यासाठी प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली आहे. संबंधित तहसीलदार, ग्रामपंचायत कार्यालयात असलेल्या या यादीतील चुका व दुरुस्तीसाठी करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी वापरलेली मतदार यादी या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी १७ मार्च रोजी प्रसिद्ध केली आहे. (प्रतिनिधी)