Join us

पूल पाडकाम प्रक्रियेस आजपासून सुरुवात; उभारणीबाबत महापालिका-रेल्वेतील मतभेद कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 2:41 AM

धोकादायक लोअर परळ पुलाच्या पाडकामाच्या निविदा प्रक्रियेस आजपासून सुरुवात होणार आहे. निविदा खुली झाल्यानंतर तातडीने कंत्राटदार नियुक्त करून पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे.

मुंबई : धोकादायक लोअर परळ पुलाच्या पाडकामाच्या निविदा प्रक्रियेस आजपासून सुरुवात होणार आहे. निविदा खुली झाल्यानंतर तातडीने कंत्राटदार नियुक्त करून पुलाचे पाडकाम करण्यात येणार आहे. तथापि, लोअर परळ पुलाची उभारणी महापालिकेने करावी, असे रेल्वेचे म्हणणे असल्याने अद्यापही महापालिका आणि पश्चिम रेल्वे प्रशासनात मतभेद कायम आहेत. यामुळे पुलाच्या उभारणीबाबत साशंकता कायम आहे.लोअर परळ पूल प्रकरणी संबंधित कंत्राटदारांना पुलाच्या पाडकामाचा आराखडा १६ आॅगस्टपर्यंत देण्याची मुभा देण्यात आली आहे. यात पाडकामाची पूर्वतयारी, विविध टप्प्यांतील कामे, लोकल ब्लॉक यांचा समावेश आहे. आराखड्यानंतर प्रत्यक्षात १२-२४ तास किंवा ३६ तास ब्लॉकचा अधिकृत निर्णय घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.अंधेरी पूल दुर्घटनेनंतर रेल्वे पुलांच्या पाहणीसाठी आयआयटीच्या नेतृत्वाखाली आणि पश्चिम रेल्वेच्या विभागीय स्तरावर दोन स्वतंत्र पथकांची नियुक्ती केली. दोन्ही तपास पथकांनी लोअर परळ पूल धोकादायक असल्याचे सांगत वाहतूक २४ जुलै रोजी पहाटे ६ वाजल्यापासून बंद करण्याच्या सूचना केल्या. दरम्यान, लोअर परळ पुलावरील करी रोड जंक्शन ते लोअर परळ स्थानक अशा मार्गादरम्यान पादचाºयांना चालण्यास मुभा प्रशासनाने दिली.कठड्यांपासून दूर राहून चालावेलोअर परळ पूल पादचाºयांसाठी अंशत: खुला करण्यात आला आहे. मात्र नागरिक पुलाशेजारील चिंचोळ्या मार्गाचा वापर करीत आहेत. यामुळे महापालिकेने पुलावरील विविध भागांत ‘सदर पुलाचा संरक्षण कठडा जीर्ण झाला असून, दगड कोसळण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून चालावे,’ असा मजकूर लिहिलेले बॅनर लावले आहेत.

टॅग्स :मुंबई