Join us

हमीभाव केंद्रावर लवकरच भाताच्या खरेदीला सुरुवात

By admin | Published: November 04, 2014 10:16 PM

खरिपाचा हंगाम संपून दाणा शिवारातून शेतकऱ्यांच्या घरात आल्याने शेतकऱ्यांना आता वेध लागलेले आहेत ते भाताला हमीभाव मिळण्याचे.

पेण : खरिपाचा हंगाम संपून दाणा शिवारातून शेतकऱ्यांच्या घरात आल्याने शेतकऱ्यांना आता वेध लागलेले आहेत ते भाताला हमीभाव मिळण्याचे. किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने धान्य विक्री करता येऊ नये, यासाठी राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने भात खरेदी केंद्र सुरू करण्याचे आदेश १ नोव्हेंबरपासून दिले असून, यावर्षी भाताला हमीभाव प्रतिक्विंटल १,४०० रुपये जाहीर केल्याने बळीराजा आनंदी आहे. याच दराने भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांचे भात खरेदी होणार असून शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर भात पिकाची नोंद असल्याची खात्री करूनच भात खरेदी करावे, असे सूचित केले आहे. राज्यामध्ये धान्य खरेदीसाठी केंद्र शासनाची नोडल एजन्सी म्हणून भारतीय अन्न महामंडळ काम पाहाणार आहे. बिगर आदिवासी क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष खरेदी मार्केटिंग फेरडरेशनद्वारा, तर आदिवासी क्षेत्रात आदिवासी विकास महामंडळाद्वारा धान्य खरेदी होणार आहे. खरेदी होणारे धान्य राज्य शासनाच्या गोदामात साठविण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. भाताच्या ए ग्रेड प्रतवारीला १,४०० रुपये हमीभाव, तर सर्वसाधारण भातास १,३६० रुपये हमीभाव जाहीर करण्यात आला आहे. १ नोव्हेंबर २०१४ ते ३० जून २०१५ असा भात खरेदी केंद्राचा कालावधी आहे. सध्या भातपिकाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात असून, शेतकऱ्यांच्या शेतातील धान्य घरात आल्याने हंगामातील मजुरांच्या खर्चावर झालेला खर्च भागविण्यासाठी दलालाकरवी कमी भावात भाताची खरेदी केली जात असल्याने आता हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांचे भात घेण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. धान्य खरेदी करताना प्रत्येक गावात धान्य खरेदी केंद्र सुरू करावे, असे शासनाचे धोरण आहे. एका गावातील शेतकरी दुसऱ्या गावातील खरेदी केंद्रावर धान्याची विक्री करण्यास गेल्यास त्याच्या धान्याची खरेदी करण्यात येऊ नये, असे निर्देश देण्यात आल्याने आता गावोगावचे भात गावातच खरेदी करण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांचा वाहतूक खर्च वाचणार आहे.