लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : इयत्ता नववी हा दहावीचा पाया समजला जातो. त्यामुळे विद्यार्थी आठवीची परीक्षा झाल्यानंतरच तत्काळ इयत्ता नववीच्या अभ्यासाला सुरुवात करतात. यंदा इयत्ता सातवी आणि नववीचा अभ्यासक्रमात बदल केला आहे. आता शाळा सुरू झाली असूनही, इयत्ता नववीच्या इंग्रजी, मराठी आणि गुजराती माध्यमाची पुस्तके उपलब्ध नसल्याने विद्यार्थी व पालक त्रस्त झाले आहेत. यंदा इयत्ता सातवी आणि नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत. त्या वेळी पुस्तक मंडळाने विद्यार्थ्यांना जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुस्तके बाजारात उपलब्ध होतील, असे बालभारतीतर्फे जाहीर करण्यात आले होते. आता जून महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला आहे. शाळादेखील सुरू झाल्या आहेत, तरीही पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. याचा फटका सुट्टीमधील क्लासेसला बसला आहे. काही ठिकाणी नववी आणि दहावीचे क्लासेस एकत्र सुरू करतात, पण पाठ्यपुस्तके उपलब्ध नसल्याने, क्लासेस रद्द करण्यात आल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. नववी आणि दहावीच्या भाषा विषयाची कृतिपत्रिकांद्वारे मूल्यमापन सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार, यंदा नववीच्या अभ्यासक्रमात बदल करण्यात आले आहेत, पण बाजारात पुस्तकेच उपलब्ध नसल्याने विद्यार्थी चिंतेत आहेत. इंग्रजी माध्यमाच्या बीजगणित या एकाच विषयाचे पुस्तक सध्या बाजारात उपलब्ध आहे. अन्य कोणत्याही विषयाची पुस्तके बाजारात उपलब्ध नाहीत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक त्रस्त झाले आहेत. मराठी माध्यमाची इतिहास, भूगोल, बीजगणित, भूमिती आणि विज्ञान विषयाची पुस्तके उपलब्ध झाली आहेत, परंतु भाषेचे एकही पुस्तक आलेले नाही. त्याचप्रमाणे, गुजराती माध्यमाचे एकही पुस्तक बाजारात उपलब्ध नाही, असे टीचर डेमोक्रॅटिक फ्रंटचे (टीडीएफ) उपाध्यक्ष राजेश पंड्या यांनी सांगितले.
शाळा सुरू; पण पुस्तकेच नाहीत
By admin | Published: June 19, 2017 3:15 AM